नवी मुंबई : बातमीदार : माहितीचा अधिकार अधिनियम 2005ची प्रभावी अंमलबजावणी करताना याविषयी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृद्धी व्हावी यादृष्टीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या प्रशासकीय प्रशिक्षण देणार्या संस्थेच्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित माहितीचा अधिकार अधिनियम विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला. माहितीच्या अधिकारासारखा नियमावलीच्या चौकटीत असलेला काहीसा रूक्ष आणि क्लिष्ट वाटणारा विषय यशदाचे प्रशिक्षक संदीप सावंत यांनी अधिनियमातील एकेका कलमांचे स्पष्टीकरण देताना विविध प्राधिकरणांमधली वेगवेगळी उदाहरणे देत इतक्या सोप्या पद्धतीने व रंजकतेने मांडला की उपस्थित 180 हून अधिक महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या समजण्यास सहजसोप्या दिलखुलास शैलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या क्षमतावृद्धीसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचे आयोजन केले जात असून माहितीचा अधिकार या लोकाभिमुख कार्यप्रणालीस पोषक विषयाबाबतचे प्रशिक्षण याच हेतूने आयोजित केले जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांनी सांगितले. माहितीचा अधिकार कायद्यातील कलम 1 ते 31 यावर प्रशिक्षणात कलमनिहाय विस्तृत विवेचन करण्यात आले व प्रश्नोत्तराच्या सत्रात विविध मुद्द्यांवर शंकानिरसनही करण्यात आले. यशदाच्या वतीने प्रशिक्षण समन्वयक दिगंबर वाघ यांनी माहितीच्या अधिकार अधिनियमातील वेळोवेळी वापरात येणार्या महत्त्वाच्या कलमांची माहिती या वेळी दिली. या प्रशिक्षणाचा उपयोग माहितीचा अधिकार अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चांगलाच होईल, असा विश्वास उपस्थित महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाने व्यक्त केला.
Check Also
पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …