मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जच्या 196 धावसंख्येच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या 92 धावांच्या शानदार खेळीमुळे दिल्लीने पंजाबवर सहा गडी राखून हा विजय मिळवला.
नाणेफेक गमावलेल्या पंजाबने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 20 षटकांत 4 बाद 195 धावा केल्या होत्या. पंजाबचा कर्णधार के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतके रचत संघासाठी बहुमुल्य योगदान दिले, मात्र पंजाबचे गोलंदाज दिल्लीच्या फलंदाजांवर लगाम घालू शकले नाहीत. धवनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
पंजाबच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दिल्लीच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या पाच षटकांतच दिल्लीने अर्धशतकी पल्ला गाठला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात अर्शदीपने पृथ्वीला बाद करीत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीने 17 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 32 धावा केल्या. यानंतर शिखर धवनने स्टीव्ह स्मिथला सोबत घेत दिल्लीला शतकाजवळ नेले. दरम्यान धवनने 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 11व्या षटकात दिल्लीने शंभरी गाठली, मात्र शेवटच्या चेंडूवर मेरेडिथने स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला. स्मिथला केवळ नऊ धावा करता आल्या. त्यानंतर शतकाकडे कूच करणार्या धवनची रिचर्ड्सनने दांडी गुल केली. धवनने 49 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांसह 92 धावा केल्या.
धवन बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि मार्कस स्टॉइनिस यांनी छोटेखानी भागीदारी रचली. शेवटची तीन षटके बाकी असताना रिचर्ड्सनने पंतला बाद केले. त्यानंतर ललित यादव आणि स्टॉइनिस यांनी 18.4 षटकांत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टॉइनिसने 13 चेंडूंत नाबाद 27 धावा केल्या. पंजाबकडून झाय रिचर्ड्सनला सर्वाधिक दोन बळी मिळाले.
तत्पूर्वी बर्थ डे बॉय के. एल. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पंजाबच्या डावाची दमदार सुरुवात केली. दिल्लीसाठी पदार्पण केलेला वेगवान गोलंदाज लुकमान मेरीवालाच्या पहिल्या षटकात या दोघांनी 20 धावा ठोकल्या. मागील काही सामन्यात फ्लॉप ठरलेल्या मयंकनेही सुंदर फटके खेळत संघाची धावसंख्या वाढवली. पॉवरप्लेच्या सहा षटकांत या दोघांनी 59 धावा उभारल्या. त्यानंतर मयंकने अर्धशतक साकारले. 10 षटकांत पंजाबने बिनबाद 94 धावा उभारल्या. 13व्या षटकात दिल्लीला पहिले यश मिळाले. मेरीवालाने स्थिरावलेल्या मयंकला बाद केले. मयंकने 36 चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांसह 69 धावांची खेळी केली. मयंक-राहुलने पंजाबसाठी 122 धावांची भागीदारी उभारली.
मयंक बाद झाल्यानंतर राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 16व्या षटकात राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. राहुलने सात चौकार आणि दोन षटकारांसह 61 धावांची खेळी केली. राहुलनंतर गेलही लवकर तंबूत परतला. वोक्सने त्याला बाद केले. गेल परतल्यानंतर दिल्लीने पंजाबला जास्त धावा काढू दिल्या नाहीत. पूरनही 19व्या षटकात स्वस्तात माघारी परतला. आवेश खानने त्याला बाद केले. शाहरूख खानने 20व्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबला दोनशे धावांच्या जवळ जाता आले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …