Breaking News

पनवेलमध्ये 16 नवे रुग्ण आढळले

अलिबागेतही शिरकाव

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात नऊ आणि ग्रामीण भागात सात असे मिळून तालुक्यात 16 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ग्रामीणमध्ये उलवे नोड येथे चार आणि विचुंबे येथे तीन अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर महापालिका हद्दीत  कामोठ्यात पाच, खारघर दोन आणि पनवेल व नवीन पनवेल येथे प्रत्येकी एकाला संसर्ग झाला आहे. पनवेलच्या मध्यवर्ती भागात रुग्ण आढळल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. नव्या रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रात 102 रुग्ण झाले असून, तालुक्यातील आकडा 126वर गेला आहे. दरम्यान, कोरोनाने अलिबागमध्येही शिरकाव केला आहे. हा व उरणमधील नवा रुग्ण मिळून रायगड जिल्ह्याचा एकूण आकडा 146वर पोहोचला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटीव्ह आढळलेली कामोठे सेक्टर 12 येथील 45 वर्षीय व्यक्ती मुंबईला रुग्णवाहिकेवर चालक असून, त्या ठिकाणी त्याला संसर्ग झाला आहे. सेक्टर 10 मधील 38 वर्षीय व्यक्ती मुंबईला शताब्दी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहे. सेक्टर 11मधील सहा महिन्यांच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्याच्या घरातील तीन व्यक्तींना यापूर्वी कोराना झालेला आहे. सेक्टर 34मधील 29 वर्षीय महिला मुंबईला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सेक्टर 6 मधील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला असून, तो गोवंडी येथील यूएसव्ही फार्मा कंपनीत कामाला आहे. या कंपनीतील तिघांना आणि त्यांच्या घरातील व्यक्तींना यापूर्वी संसर्ग झालेला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 4 मधील 54 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून, ही व्यक्ती रिलायन्स कंपनीत कामाला आहे. त्या ठिकाणी तिला संसर्ग झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पनवेल शहरातील टपाल नाका येथील एमजी रोडवर राहणार्‍या व मुंबई पोलीस दलात काम करणार्‍या 29 वर्षीय कर्मचार्‍याला कोरोना झाला आहे. हा पनवेलचा मध्यवर्ती परिसर असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पनवेल महापालिका हद्दीत सोमवारपर्यंत 1107 जणांची टेस्ट केली गेली. त्यापैकी 32 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी 62 जणांवर  उपचार सुरू असून, 38 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी सात नवीन रुग्ण आढळले. त्यामध्ये विचुंबेतील तीन आणि उलवे नोडमधील चार जणांचा समावेश आहे. विचुंबे येथील ॐकार पार्कमधील एकाच घरातील 29 वर्षीय आणि 25 वर्षीय महिला यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यापूर्वी यांच्या घरातील पुरुष कोरोनाबाधित आहे. आता घरात 70 वर्षीय व्यक्ती आणि तीन वर्षांची मुलगी आहे. सोसायटीत सर्वांनी दारे बंद केल्याने त्यांच्या खाण्याची व्यवस्था गटविकास अधिकारी तेटगुरे यांनी ग्रामसेवकांना करायला सांगितली आहे. विचुंबेतील साई दर्शन अपार्टमेंटमधील 35 वर्षीय व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कामगार आहे. त्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. उलवे नोड सेक्टर 8 मधील रिद्धी-सिद्धी सोसायटीतील आई, पाच वर्षांचा मुलगा आणि एक वर्षाच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सेक्टर 3मध्ये राहणार्‍या वाहतूक पोलिसालाही कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये कोरोनाचे 24 रुग्ण झाले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply