Breaking News

आपत्तीग्रस्तांना केंद्राची मदत

महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी निधी मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे प्रभावित देशातील राज्यांना निधी मंजूर केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांना एकूण 4,381.88 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय आयोगाने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, एनडीआरएफ अंतर्गत सहा राज्यांना अतिरिक्त केंद्रीय सहाय्य मंजूर केले आहे. या मंजुरीनंतर देशातील सहा राज्यांना 4,381.88 कोटी रुपये दिले जातील. चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालला 2,707.77 कोटी, तर ओडिशाला 128.23 कोटी रुपये देऊ करण्यात आले आहेत. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळमुळे झालेल्या नुकसानीसाठी महाराष्ट्राला 268.59 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
कर्नाटकमध्ये पूर आणि दरड कोसळून झालेल्या नुकसानीसाठी 577.84 कोटी रुपये, मध्य प्रदेशला 611.61 कोटी रुपये आणि सिक्कीमला 87.84 कोटी रुपये दिले जातील.
विविध नैसर्गिक आपत्तींनंतर केंद्र सरकारच्या वतीने आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथके तयार करून त्या त्या राज्यांत पाठविण्यात आली होती. याशिवाय सन 2020-21 या आर्थिक वर्षात आजपर्यंत केंद्र सरकारने एसडीआरएफकडून 28 राज्यांना 15,524.43 कोटी रुपये दिले आहेत.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply