कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त कर्जतमध्ये हुतात्मा स्मृती समितीच्या वतीने मशाल मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील माजी सैनिकांनी आपले अनुभव सांगून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले.
कर्जतच्या टिळक चौकात हुतात्मा बलिदान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महादेव जुन्नरकर यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. निवृत्त सैनिक विनायक उपाध्ये, भगवान शिंदे, धुळे, नितीन शिंदे यांच्या हस्ते पहाटे क्रांती ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मिरवणूक टिळक चौकात आल्यानंतर शुभम ढाकवळ या तिसर्या इयत्तेत शिकणार्या व सृष्टी ढाकवळ या आठव्या इयत्तेत शिकणार्या विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांच्या कार्याची माहिती सांगितली. निवृत्त सैनिक विनायक उपाध्ये, भगवान शिंदे, दगडू धुळे यांनी सीमेवरील आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कोंडीलकर यांनी केले, तर आभार श्रीकांत आगीवले यांनी मानले.
या वेळी महेंद्र चंदन, अनिल भोसले, निवृत्ती ढाकवळ, सुधीर कांबळे, सुनील आढाव, दीपक पवार, दीपक भालेराव, शशिकांत मंडलिक, संतोष ऐनकर, चंद्रशेखर जुईकर, रवींद्र सोनवणे, अॅड. भारती ढाकवळ, प्रभाकर आसवले आदींसह कर्जतमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.