Breaking News

नेरळच्या कोरोनाबाधित क्षेत्रात 17 मेपर्यंत सर्व व्यवहार बंद

व्यापार्‍यांना करावी लागणार प्रतीक्षा

कर्जत : बातमीदार – नेरळमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पुढील सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण आता होम क्वारंटाइन आहे. त्यामुळे कोरोनाबाधित क्षेत्रातील व्यवहार सुरू करावेत अशी मागणी होत आहे, मात्र नेरळमधील तो 500 मीटरचा परिसर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अधिपत्यात असून, 17 मेपर्यंत त्या भागात कोणतेही व्यवहार सुरू होणार नाहीत, असे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परिणामी व्यापार्‍यांना आपली दुकाने उघडण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

नेरळमधील सुगवेकर आळीत राहणारा एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नेरळ गाव 20 एप्रिलपासून सील असून, 21 ते 24 एप्रिल या कालावधीत नेरळ गाव आणि सर्व व्यवहार 100 टक्के बंद होते. त्या तरुणाच्या घरापासूनचा भाग हा कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित केल्याने तेथील परिसर 28 दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. कोरोनाबाधित तरुणाच्या कुटुंबातील चार जणांच्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन अशा सहा जणांच्या कोरोना टेस्ट आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आणि त्या सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत, तर कोरोनाग्रस्त तरुण ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, 17 एप्रिलपासून आतापर्यंत त्याच्या तीन कोरोना टेस्ट घेण्यात आल्या. त्यातील पहिली टेस्ट पॉझिटिव्ह झाली आणि त्यानंतरच्या सलग दोन टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. आता त्या तरुणाची शेवटची टेस्ट निगेटिव्ह निघाल्यानंतर हा तरुण आपल्या घरी नेरळमध्ये आला आहे. तेथे तो तरुण 14 दिवस होम क्वारंटाइन असणार आहे. त्यामुळे सध्यातरी नेरळ गावावर आलेले कोरोनाचे मळभ दूर होणार आहे, मात्र नेरळमधील कंटेन्मेंट झोन लॉकडाऊनच आहे. सोमवारी 15व्या दिवशी नेरळमधील कोरोनाबाधित क्षेत्रातील दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाला, मात्र काही ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून उघडलेली दुकाने बंद केली. शेवटी सायंकाळी पोलिसांनी कोरोनाबाधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेची आणि जीवनावश्यक वस्तू यांची दुकाने 17 मेपर्यंत बंद राहतील असे जाहीर केले.

नेरळमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यापासून 28 दिवसांचा कालावधी 17 मे रोजी संपुष्टात येत आहे.त्यामुळे पोलीस दलाकडून कोरोना बाधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेची दुकाने खुली करण्याची परवानगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून घ्यावी, असे सुचविण्यात आले आहे. नेरळ व्यापारी फेडरेशनकडून पोलीस ठाण्यात व्यापार्‍यांनी आपली दुकाने उघडण्याची परवानगी मागितली, मात्र पोलिसांनी कर्जत तहसीलदारांशी संपर्क साधून जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केले तरच आम्ही परवानगी देऊ शकतो, असा खुलासा केला आहे. त्यामुळे सध्यातरी नेरळ गावातील कोरोनाबाधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेची दुकाने 17मे पर्यंत बंद असणार आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply