Breaking News

कर्जत तालुक्यात सात वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील पाणीटंचाई कृती समितीने शासनाच्या परवानगीनंतर दोन टँकरच्या माध्यमातून सात आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. दरम्यान,तालुक्यातील 24 गावे आणि 57 आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त असून, त्या सर्व ठिकाणी पिण्याचे पाणी आणण्यासाठी स्थानिक लोकांची वणवण सुरू आहे.

कोरोनामुळे रोजगाराअभावी आधीच आदिवासी लोक विवंचनेत असताना आता त्यात पाणीटंचाईची भर पडली आहे. कर्जतची भौगोलिक रचना पाहता तालुक्यातील अर्ध्या भागात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. त्यामुळे शासन या भागात दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करीत असते. या वर्षी तब्बल 81 गावे आणि आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त असून, या सर्व गावे आणि वाड्यांकडून पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार गटविकास अधिकारी, लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांनी प्रस्ताव आलेल्या वाड्यांमध्ये जाऊन पाण्याची स्थिती जाणून घेतली होती. त्यांनी आपला अहवाल दिल्यानंतर कर्जतच्या प्रांत अधिकार्‍यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील दोन टँकर अधिग्रहित करण्यात आले आहे.

कर्जत येथे टँकर आल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग येऊ नये यासाठी खबरदारीची घेत त्या दोन्ही टँकरचे चालक आणि क्लिनर यांची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर टँकर व पाण्याचे निर्जंतुकीकरण केले गेल. मग तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त अंभेरपाडा, मोरेवाडी, बागंरवाडी, धाबेवाडी,किकवी, बोरवाडी आणि धोत्रेवाडी या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

टँकर सुरू करण्यात आल्यानंतर त्यांना कर्जत-मुरबाड रस्त्यावरील पेज नदीतील पाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. आता नवीन प्रस्ताव आले असून त्या ठिकाणी पाहणी करून अहवाल प्रांत अधिकार्‍यांना पाठवला जाईल आणि नंतर आवश्यकतेनुसार टँकर सुरू केले जातील.

-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, कर्जत

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply