Breaking News

परिस्थिती आटोक्यात पण…

लॉकडाऊनमुळेच एव्हाना कोरोनाच्या प्रादुर्भावाचे उत्तम व्यवस्थापन सरकारी यंत्रणांना शक्य झाले आहे. लॉकडाऊनआधी कोरोनाच्या केसेस साडेतीन दिवसांत दुप्पट होत होत्या तर आता हे प्रमाण 12 दिवसांवर आले आहे. हा निश्चितच दिलासादायक बदल आहे. परंतु केसेस मात्र अजूनही वाढत आहेतच.

भारतातील लॉकडाऊनचा मंगळवारी 42वा दिवस होता. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून देशभरातील तमाम जनता त्यांच्यावरील विश्वासातून संपूर्ण सहकार्याच्या भावनेने  सरकारच्या कोरोनाविरोधी लढाईत सहभागी झाली. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपणार होता. परंतु देशव्यापी लॉकडाऊनचे फायदे ठळकपणे ध्यानात आल्याने केंद्र सरकारने हीच उपाययोजना टप्प्याटप्प्याने काही सवलती देऊन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी आजवरच्या एका दिवसातील सर्वाधिक केसेस तसेच मृत्यूंचीही नोंद झाली. परंतु काही राज्ये केसेसची नोंद सातत्याने न करता एकत्रितपणे करीत असल्याने अशी एकाच दिवसात खूप मोठी वाढ दिसून येते याकडेही आरोग्य मंत्रालयाने निर्देश केला आहे. मंगळवारी कोरोनाच्या 3875 केसेस तसेच 194 मृत्यूंची नोंद झाली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या संध्याकाळपर्यंत 46,711 इतकी झाली होती. यापैकी 31,966 रुग्ण हे आताच्या घडीला प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. देशातील एकूण कोरोना बळींची संख्याही एव्हाना दीड हजाराच्या पुढे गेली आहे. या काळात एकूण 13 हजार 161 रुग्ण कोरोनाबाधेतून बरेही झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण सध्या 27.41 टक्के इतके असल्याचे सांगितले जाते. देशातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत 111 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दुर्दैवाने सर्वाधिक कोरोना बळी हे महाराष्ट्रात नोंदले गेले असून त्यांची संख्या 583 इतकी असून महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये 319 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापाठोपाठचे कोरोना बळी मध्य प्रदेश 176, पश्चिम बंगाल 133, राजस्थान 77, दिल्ली 64, उत्तर प्रदेश 53 आणि आंध्र प्रदेश 36 असे आहेत. सर्वाधिक 14,541 कोरोना केसेसही महाराष्ट्रातच नोंदल्या गेल्या असून त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 5804, दिल्ली 4898, तामिळनाडू 3550, मध्य प्रदेश 3049, राजस्थान 3061 आणि उत्तर प्रदेश 2859 इतक्या केसेसची नोंद झाली आहे. देशातील कोरोना केसेसचे व्यवस्थापन व्यवस्थित सुरू असल्याचा विश्वास प्राप्त झाल्यानंतरच आता सरकारने जगभरात ठिकठिकाणी अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने अतिशय खंबीरपणे निर्णय घेऊन देशात होणारी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पूर्णपणे रोखली होती. यामुळे असंख्य कामगार आणि विद्यार्थी जगभरात ठिकठिकाणी अडकले होते. आता मात्र 7 तारखेपासून यातील गरजूंना प्राधान्याने मायदेशी आणले जाणार असून पहिल्या टप्प्यात 13 देशांतून 64 हवाई फेर्‍यांतून तसेच नौदलाच्या तीन जहाजांतून हे भारतीय घरी परततील. एकंदर 14 हजार 800 भारतीयांचा यात समावेश असून आठवडाभराच्या काळात त्यांना देशात परत आणले जाईल. देशातील निरनिराळ्या राज्यांत अडकलेले स्थलांतरित मजूर असोत वा जगाच्या कानाकोपर्‍यात खोळंबलेले भारतीय अनेक आघाड्यांवर सरकार मदत घेऊन धावून जाते आहे. अतिशय आव्हानात्मक अशा या कालखंडात आपणही योग्य ती खबरदारी घेण्याची जबाबदारी पार पाडून सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ दिलेच पाहिजे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply