नगरपालिका रुग्णालय, वाइन शॉप व बँकांबाहेर मोठ्या रांगा
खोपोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर मंगळवारी (दि. 5) खोपोली शहरात अनोखे व तेवढेच विचित्र आणि भयावह दृश्य सर्वत्र दिसले. परप्रांतीयांची आरोग्य दाखला मिळविण्यासाठी नगरपालिका रुग्णालय आवारात मोठी रांग, तळीरामांच्या शहरातील सर्व वाइन शॉप परिसरात लांबच लांब रांगा व पेन्शनर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध बँकांबाहेर लागलेल्या रांगांमुळे मंगळवारी संपूर्ण शहरात सर्वत्र रांगांचे चित्र दिसत होते. दुसर्या दिवशीही सर्वांत मोठी गर्दी नगरपालिका रुग्णालयात आरोग्य दाखला प्राप्त करण्यासाठी परप्रांतीय नागरिकांनी केली होती. येथे जवळपास अर्धा किमीपर्यंत लांब रांग लागली होती. दुसरीकडे दीड महिन्यानंतर मंगळवारी खोपोलीतील वाइन शॉप उघडण्याची परवानगी मिळाल्याने मद्य खरेदी करण्यासाठी तळीरामांच्या भल्यामोठ्या रांगा शहरातील सर्वच वाइन शॉप परिसरात लागल्या होत्या. दरम्यान, पेन्शनरांचे पेन्शन, सरकारी व विविध शैक्षणिक संस्थांचे पगार जमा झाल्याने शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांबाहेर ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मोठी कुमक या सर्व ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती. आरोग्य दाखला प्राप्त करणार्यांची गर्दी कमी करण्यासाठी नगरपालिकेकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून, नगरपालिका शिक्षकांना या कामी लावण्यात आले आहे. दोन शिक्षकांना एका प्रभागाची जबाबदारी देण्यात आली असून त्या-त्या प्रभागातील परप्रांतात जाण्यासाठी इच्छुक नागरिकांची यादी तयार करण्याचे काम हे शिक्षक करणार आहेत. या यादीनुसार क्रमाक्रमाने टोकन देऊन त्यांना नगरपालिका रुग्णालयात उपस्थित राहून आरोग्य दाखला वितरित केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असे आवाहनही नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.