सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे आवाहन
मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेले लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने मंगळवारी (दि. 5) काही दुकाने उघडण्यात आली होती, परंतु आदेशात नमूद नसतानासुद्धा काही कपड्यांची दुकानेही उघडण्यात आली. त्यामुळे मुख्य बाजारात गर्दी झाली होती. ही बाब मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी नागरिकांनी बाजारात विनाकारण गर्दी करू नये, असे नागरिकांना आवाहन केले. लॉकडाऊनचा शेवटचा टप्पा सुरू असून लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळा. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही नागरिकांशी संवाद साधताना पवार यांनी स्पष्ट केले. मुख्य बाजारपेठेमधील काही कपड्यांची दुकाने सुरू होती. या वेळी या दुकान मालकांशी संवाद साधताना पवार यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशात कपड्यांच्या दुकानांचा उल्लेख नसल्याचे व्यापारीवर्गाच्या निदर्शनास आणून दिले. फक्त सिंगल स्टँड दुकानेच खुली राहणार आहेत. त्यामुळे व्यापार्यांनी ताबडतोब आपली दुकाने बंद करावीत, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आवाहनाला सर्व कापड व्यापार्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपली दुकाने बंद केली. या वेळी पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी मुरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडित यांना फोन करून जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशप्रमाणे दोषी व्यक्तींवर कार्यवाहीसाठी नगर परिषदेचे कर्मचारी पाठवण्यास सांगितले. हे कर्मचारी उपस्थित झाल्यावर पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शहरात स्वच्छता व नागरिकांना चुकल्यावर दंड भरावा लागतो हे कळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये, चेहर्यावर मास्क अथवा रुमाल न बांधणार्यांना 500 रुपये, दुकानाजवळ सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्यांना 200 रुपये, तर दुकानदाराने ग्राहकांची गर्दी करून माल विकल्यास 1000 रुपये दंड आकारण्यास सुरुवात करा. सर्व कर्मचार्यांनी फिरून दंड आकारणी सुरू करावी, असे आदेशही पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी या वेळी दिले.