कडधान्य शेतीला पूरक हवामानामुळे शेतकरी समाधानी
माणगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून माणगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. डिसेंबर महिना सुरू झाला तरी थंडीच्या मोसमाची प्रतीक्षा करणार्या माणगावकरांना गेल्या काही दिवसांत थंड हवेचा अनुभव येऊ लागला आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसाने ऋतुचक्र पूर्णपणे बदलले होते. ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्यासारखे वातावरण अनुभवायला मिळाले. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून जाणवणारी थंडी लांबत गेली. डिसेंबर महिना सुरू झाला तरी थंडीची चाहूल लागत नव्हती. त्यामुळे रब्बी पिकाचेही नुकसान होईल असे शेतकरी सांगत होते. मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर वातावरणात हलकासा गारवा जाणवू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सकाळी दाट धुके व किंचित गारवा जाणवू लागला आहे. पुढील काही दिवसात थंडी वाढेल, असे जाणकार सांगतात. थंडीचे हवामान कडधान्य शेतीला पूरक असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
गेल्या काही दिवसापासून वातावरणात गारवा वातावरणात जाणवू लागला आहे. यापुढे थंडी वाढेल अशी अपेक्षा आहे.
-मंगेश खडतर, ग्रामस्थ, माणगाव
थंडीमुळे रब्बी पिकांची चांगली वाढ होईल. थंड हवामान कडधान्य पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. गेल्या काही दिवसंपासून थंडी जाणवू लागली आहे.
-बाळाराम भोनकर, शेतकरी, माणगाव