पेण ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात वाइन आणि बीअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर तळीरामांनी दुकाने सुरू होण्याआधीच दुकानांसमोर गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पेणमध्ये वाइन, बीअर शॉप दुकानांसमोर आधीच रांगा लागल्या होत्या. विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली, तसेच अनेक जण आजूबाजूला उभे होते. जिल्ह्यात दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर दुकानमालक जातीने लक्ष देऊन सोशल डिस्टन्सिंग पाळत मद्यविक्री करीत होते. मंगळवारी (दि. 5) सकाळी आठ वाजल्यापासूनच मद्यप्रेमी दुकानांभोवती घुटमळत उभे होते, परंतु वाइन शॉप उघडले नसल्याने मद्यपींचा हिरमोड झाला. यामुळे अनेकांनी बीअर शॉपसमोर गर्दी केली. सकाळी नऊ वाजता ही गर्दी वाढली. या वेळी जवळजवळ 200 ते 300 मीटर लांब मद्यपींच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. काही ठिकाणी गर्दी वाढल्यामुळे पोलीस बळाचा वापरही करण्यात आला.