Breaking News

माथेरान पर्यटकांनी गजबजले

मिनीट्रेन शटल सेवेच्या फेर्‍यांमध्ये वाढ

कर्जत : बातमीदार
प्रसिद्ध माथेरान पर्यटनस्थळ पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजले आहे. लॉकडाऊननंतर आठ महिन्यांनी प्रथमच माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळाली. ऐन दिवाळीत पर्यटकांच्या आगमनाने माथेरानकर सुखावला आहे. दरम्यान, पर्यटकांसाठी मिनीट्रेनच्या शटल सेवेत वाढ करण्यात आली असून, 22 नोव्हेंबरपर्यंत शटल सेवेच्या आठ फेर्‍या असणार आहेत.
दिवाळी हा माथेरानचा प्रमुख पर्यटन हंगाम  मानला जातो. कोरोना काळात पर्यटक माथेरानला येतील की नाही अशी शंका स्थानिकांमध्ये होती, पण पर्यटकांनी माथेरानवरचे प्रेम अबाधित ठेवत आवर्जून हजेरी लावली. येथील हॉटेल, लॉजिंग, पॉईंट्स असे सर्व काही पर्यटकांनी गजबजले आहे. त्यामुळे गेले आठ महिने शांत असणार्‍या माथेरानमध्ये आता सरबराईची लगबग आहे.
लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पर्यटकांनी माथेरानकडे मार्गस्थ होण्यास सुरुवात केली. उपनगरीय लोकलसेवा बंद असल्याने पर्यटकांनी आपल्या खाजगी वाहनाने माथेरानमध्ये दस्तक दिली. त्यामुळे येथील वाहनतळ वाहनांनी भरून गेले. चारशे चार चाकी वाहने आणि पाचशे पन्नासपेक्षा अधिक वाहने उभी राहिली. तरीही पार्किंगसाठी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
‘माथेरानची राणी’ हाऊसफुल!
माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनही पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचे दिसून आले. शनिवार, रविवार अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी चार वेळा धावणारी अमन लॉज-माथेरान शटल पर्यटकांनी भरून धावत होती. त्यामुळे 22 नोव्हेंबरपर्यंत शटल सेवेच्या रोज अप-डाऊन मार्गावर आठ फेर्‍या होणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय यंदाच्या हंगामात माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply