तळीरामांची नाराजी
कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यात वाइन शॉप आणि बीअर शॉपी उघडण्यास रायगड जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे, मात्र नेरळ गावातील एकमेव वाइन शॉप हे कोरोनाबाधित क्षेत्रात असल्याने उघडले नाही. परिणामी वाइन शॉपसमोर सलग तीन दिवस रांगा लावणार्यांचा हिरमोड झाला असून बाधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी असलेल्या बीअर शॉपी मात्र उघडल्या आहेत. 4 मेपासून मुंबई एमएमआरडीए क्षेत्रातील वाइन शॉप आणि बीअर शॉपी यांच्यावरील निर्बंध उठवण्यात आले होते. त्यामुळे दीड महिना ताटकळत असलेले हौशे आणि तळीरामांनी वाइन शॉपजवळ मोठी गर्दी केली. रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशी गर्दी असताना नेरळमध्ये असलेल्या वाइन शॉपबाहेरही गर्दी जमली होती, पण उत्पादन शुल्क विभागाचा आदेश आला नसल्याने 4 मे रोजी नेरळ तसेच कर्जत शहरातील वाइन शॉप उघडले नव्हते. 5 मे रोजी कर्जत शहरातील वाइन शॉप उघडले. त्याचवेळी तालुक्यातील ग्रामीण भागात, रस्त्याच्या कडेला असलेल्या बीअर शॉपीही उघडल्या आणि दीड महिना बंद असलेल्या बीअर शॉपींबाहेर एकच गर्दी जमली.