महाड : प्रतिनिधी
गेली दिड महिनाभरापासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. टप्प्यावर याचा कालावधी वाढत असला तरी गेल्या काही दिवसांपासून महाडमध्ये कलम 144 लागू आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर वाढती गर्दीपाहून महाड शहरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. प्रशासन मात्र ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असला तरी देशातील स्थिती सुधारण्यात मदत होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाड शहरात ग्रामीण भागातील गर्दी खरेदीसाठी वाढू लागली आहे. शिवाय काही दुकाने आणि मद्य विक्रीस परवानगी दिल्याने दोन महिन्यांपासून घरात बसलेले काही नागरिक शहरात येऊ लागले आहेत. याचबरोबर अनावश्यक फिरणार्या लोकांची देखील गर्दी दिसू लागली आहे. जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र शहरातील गर्दी पाहून कलम 144 आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
– सीमाबंदीचे पालन व्हावे
महाड शहर वगळता खेड, मंडणगड या तालुक्यात सीमा बंदीचे काटेकोर पालन केले जात असल्याचे स्थानिक वाहनचालक सांगत आहेत. शहरात प्रवेश करणे सोपे झाले आहे. शहराच्या प्रवेश सीमांवर वाहनाच्या तपासणी होत नाहीत. शहरात मात्र वाहनांवर कारवाई केली जात आहे. काही दुकाने सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक महाडमध्ये येऊ लागले आहेत.
– मद्यविक्रीनंतर गर्दी वाढली
महाड शहरात दोन वाईन शॉप आहेत. शासनाने मद्य विक्री सुरू करताच या दुकांनासमोर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. मद्य खरेदी करण्यासाठी बहुतांश नागरिक हे ग्रामीण भागातील आणि लॉकडाऊन पूर्वी मुंबई आणि अन्य शहरातील बाहेरून आलेले तरुण दिसत आहेत.
– अत्यावश्यक सेवांवर नियंत्रण हवे अत्यावश्यक सेवांमध्ये भाजीपाला, दूध विक्री, बेकरी, याचबरोबर किराणा दुकान यांचा समावेश करण्यात आला आहे. शहरात येणार्या फळ, भाजीपाला, यांची तपासणी आणि जंतुनाशक फवारणी केली जात नाही. अत्यावश्यक सेवेचे फलक लावून अनेक वाहने फिरताना दिसत आहेत.