घरांचे नुकसान झाल्याने ढेकू ग्रामस्थांची मागणी
खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात डोंगर पोखरण्यासाठी भूसुरुंग लावल्याने ढेकू गावात मोठे दगड गोटे पडल्याने, अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी गुरुवारी (दि. 5) ठेकेदार अफकॉन कंपनीच्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
खंडाळा घाटात डोंगर पोखरण्यासाठी अफकॉन कंपनीने बुधवारी केलेल्या भूसुरुंग स्फोटाने उडालेले दगड ढेकू गावातील अनेक घरांवर पडल्याने नुकसान झाले होते. विशेष म्हणजे गावात लग्न असल्याने सर्व ग्रामस्थ लग्न मंडपात उपस्थित होते, अन्यथा जीवितहानी झाली असती, असा मुद्दा पोलीस ठाण्यात चर्चेच्या दरम्यान माजी जिप सदस्य नरेश पाटील यांनी उपस्थित केला. असा प्रकार अनेक वेळा झाला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
पोलीस निरीक्षक पवार यांनी संबंधित अधिकार्यांना धारेवर धरत, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करणार असल्याचे ठणकावून सांगितल्यानंतर, उपस्थित कंपनीचे अधिकारी हादरून गेले.
संबंधित अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा व ज्या ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने भरपाई देण्याची आग्रही मागणी या वेळी झालेल्या बैठकीत केली.
खोपोली पोलीस ठाण्यात झालेल्या या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश कळसेकर, साजगाव ग्रामपंचायत सदस्य अजित देशमुख यांच्यासह ढेकू ग्रामस्थ आणि अफकॉन कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.