कर्जत : बातमीदार
पावसाळ्यातील भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून राज्य शासनाने 27 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जत तालुक्यातील 1612 शेतकर्यांना त्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत नुकसानग्रस्त असलेल्या आणि शेतीचे पंचनामे झालेल्या 8432 शेतकर्यांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील 10हजार 44 शेतकर्यांच्या 2942 हेक्टर जमिनीवरील भात, नागली, वरी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यापैकी 1612 नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये 27 नोव्हेंबर 2019 रोजी पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम जमा करण्यात आली होती. त्यावेळी शासनाकडून एकूण 57लाख 10हजार 313 एवढी रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली होती. त्यानंतर मात्र उर्वरित 8432 शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना मदतीसाठी आवश्यक असलेली दोन कोटी रकमेची मागणी कर्जत तहसिल कार्यालयाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी ती मदत अपुरी असल्याची भावना राज्यातील काही लोकप्रतिनिधींनी व शेतकर्यांनी व्यक्त केली होती. नवीन सरकार सत्तेवर आल्यावर त्यात वाढ होईल, अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा होती. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तीत्वात येवून काही दिवसांचा अवधी लोटला तरी शासनाची मदत कर्जत तालुक्यातील काही नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही, यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा आणखी संकटात सापडला आहे.
आम्ही पंचनामे झालेल्या सर्व शेतकर्यांच्या आधार कार्ड, बँक डिटेल्स आणि सातबारा उतारा यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे. मदतीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर काही तासांत तत्काळ ती शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते असे नियोजन आहे.
-विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत
शासनाने मदत जाहीर केली, म्हणजे ती मिळेल असे सर्वांना खात्रीने वाटत होते, पण तालुक्यातील नुकसानग्रस्त 10 हजारहुन अधिक शेतकरी असताना त्यातील फक्त दीड हजार शेतकर्यांना नुकसानीची भरपाई मिळाली आहे. मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.
-योगेश दाभाडे, शेतकरी, मांडवणे
महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्षाने हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले होते, ते पूर्ण करावे.
-सुनील गोगटे, राज्य उपाध्यक्ष,
भाजप किसान मोर्चा
शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतावर जाऊन, नुकसानीचे पंचनामे करून ते शासनाकडे पाठवले आहेत. त्याचवेळी आजही काही तक्रारी आल्या तरी आम्ही त्या त्या भागात जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत असतो. शेतकर्यांना मदत मिळणे, हा प्रयत्न आहे, त्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे.-शीतल शेवाळे, तालुका कृषी अधिकारी, कर्जत
RamPrahar – The Panvel Daily Paper