पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर शासनाने लॉकडाऊन जारी केले आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नसल्याने सफाई कामगार, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी मोठी कामगिरी बजावत आहेत. हे काम करताना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी या सर्व अत्यावश्यक सेवा देणार्यांना आय फ्लेक्स टेक्नॉलॉजिसचे डायरेक्टर रणजीत मच्छिंद्र नरुटे यांनी शुक्रवारी (दि. 8) पूर्ण चेहर्याला सुरक्षित ठेवणारे पारदर्शी फेस शिल्ड मास्कचे
वाटप केले. संचारबंदीत संपुर्ण पनवेलची काळजी तुम्ही घेत आहातच, त्याचप्रमाणे स्वतःचीही काळजी घ्या असे नरुटे यांच्याकडून सांगण्यात आले. या वेळी त्यांच्याबरोबर समीर अत्तार, दिनेश परब, विक्रम नरुटे, विशाल मालगावकर, सुरज जाधव, राहुल डोंबाळे आदी उपस्थित होते.
मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली
मुंबई : येथील महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करत त्यांच्याजागी इक्बाल चहल यांच्याकडे मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे तर नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव इक्बाल चहल हे आता मुंबई पालिका प्रशासनाचे प्रमुख असणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा आदेश काढला असून या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. चहल यांच्याकडे जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. पुढील आदेशापर्यंत या पदाचा कार्यभारही सांभाळण्याचे आदेश परदेशी यांना देण्यात आले आहेत.
श्रीवर्धन बाजारपेठेला जत्रेचे स्वरुप
श्रीवर्धन : प्रतिनिधी
संपूर्ण श्रीवर्धन शहराला शुक्रवारी (दि. 8) पुन्हा एकदा जत्रा भरल्याचे स्वरूप आले होते. श्रीवर्धन बाजारपेठ, टिळक मार्ग, वाणी आळी त्याचप्रमाणे मच्छी मार्केट व भाजी मार्केट याठिकाणी काही नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती. श्रीवर्धन शहराच्या श्रीमंत पेशवे प्रवेशद्वारावरील पोलीस बंदोबस्त देखील कमी करण्यात आला आहे. तसेच शिवाजी चौक त्याचप्रमाणे आंबेडकर चौक या ठिकाणी लावलेला पोलीस बंदोबस्त देखील काढण्यात आलेला आहे. त्यातच श्रीवर्धनच्या नागरिकांना भीती भेडसावत आहे ती मुंबईहून येणार्या नागरिकांची! कारण श्रीवर्धन शहरात व तालुक्यात येणारे बहुतांश नागरिक स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेऊन होम क्वारंटाइनचा शिक्का मारून घेत नसल्यामुळे मुंबईतून आलेल्या नागरिकांचा देखील शहरात व तालुक्यात मुक्तसंचार सुरू आहे.