Breaking News

महाडमध्ये परप्रांतिय कामगाराला कोरोना

तालुक्यात उडाली खळबळ

महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यातील बिरवाडीपाठोपाठ सवाणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शेलटोली गावात राहात असलेल्या एका 45 वर्षीय परप्रांतिय कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला यापूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली.

महाड तालुक्यातील शेलटोली गाव हे बिरवाडी औद्योगिक वसाहतीच्या जवळ असून, या गावात राहणारा एक परप्रांतिय कामगार कंत्राटी पद्धतीने कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला 30 एप्रिल रोजी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तपासणीसाठी या कामगाराला मुंबई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असता, 6 मे रोजी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सिराज बिरादार यांनी दिली.

या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी बिरवाडी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले.  या परप्रांतिय व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम वैद्यकीय अधिकारी करीत असून, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ग्रुप ग्रामपंचायत सवाणेकडून कळविण्यात आले आहे. नव्या रुग्णामुळे महाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर पोहोचली आहे. त्यापैकी पहिला रुग्ण महिलेचा मृत्यू झालेला आहे.

मुंबई, पुण्यामध्ये लॉकडाऊन काळात अडकून राहिलेले ग्रामस्थ आता पुन्हा आपल्या गावाकडे येत असून, येणार्‍या सर्व ग्रामस्थांची कसून वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर बाहेर गावाहून येणार्‍या सर्वांना सक्तीने क्वारंटाइन करण्यात यावे, अशी मागणी महाड तालुक्यातून होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply