चिपळूण ः प्रतिनिधी
चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चिपळूणमध्ये गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात गेले. हे कोविड रुग्णालय असून तेथे 21 रुग्ण उपचार घेत होते. त्यातील काही जण व्हेंटिलेटरवर होते. यातील आठ कोरोना रुग्णांचा शुक्रवारी (दि. 23) ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. चिपळुणात मोबाइलला नेटवर्क नाही आणि असंख्य लोकांचे मोबाइल चार्जिंगअभावी बंद झाले आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. परिणामी रुग्णालयात नेमके काय झाले याची माहिती समजू शकलेली नाही, मात्र 11 रुग्ण दगावल्याचे सांगितले जात आहे.