पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाविरुद्धची लढाई ही दीर्घकालीन असून, देशातील 130 कोटी जनता या युद्धात जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 6) काढले. ते भारतीय जनता पक्षाच्या 40व्या स्थापना दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांपुढे पाच आग्रह धरले. या संकल्पांद्वारे कोरोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारत हा विकसनशील देश आहे. आपण एकीकडे गरीबीसारख्या मोठ्या प्रश्नाशी लढत आहोत, तर दुसरीकडे कोरोनाचे मोठे संकट आले आहे. अशा परिस्थितीत दक्षेशाला दीर्घ लढाईसाठी तयार राहिले पाहिजे. या लढाईत थकून चालणार नाही तसेच हारूनही चालणार नाही. आपल्याला विजयी व्हायचे आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण खंबीरपणे पुढे जात आहोत. आपल्या प्रयत्नांची सर्व राष्ट्रांनी, जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसा केली आहे. कोरोनाशी लढताना आपण सर्व देशांसमोर एक
उत्तम उदाहरण दिले आहे.
या लढ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांना नमन. रविवारी दिवे लावण्याच्या करण्यात आलेल्या आवाहनालाही देशातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला. प्रत्येक नागरिक आज स्वत:ला आणि देशाला वाचवण्यासाठी लढतोय. सर्व भारतीय आज एकत्र, एकसंध आहेत, असेही त्यांनी नमूद केले.