Breaking News

मोहोपाडा, चौकमध्ये बाहेरील व्यक्तींकडून दारू खरेदी

आमदार महेश बालदी यांनी वेधले पोलीस आयुक्तांचे लक्ष

उरण : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील मोहोपाडा व चौक या परिसरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, मात्र पनवेल व नवी मुंबईतून दारू खरेदीसाठी येत असलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भावापासून येथील लोकांना वाचवावे, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना दिले आहे.
आमदार महेश बालदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाने लॉकडाऊन काळात असलेली दारू बंदी उठवली आहे. उरण व पनवेल तालुक्यांचे क्षेत्र रायगड जिल्ह्यात येत असून, जिल्हाधिकार्‍यांनी शासनाच्या धोरणानुसार दारू विक्रीवरील बंदी शिथिल केलेली आहे, परंतु असे कळते की, उरण व पनवेल येथील दारूची दुकाने आपल्या आदेशाने बंद आहेत.
मी ज्या उरण मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करतो तो माझा मतदारसंघ उरण, पनवेल, खालापूर अशा तीन तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. यापैकी खालापूर तालुक्यातील दारू विक्रीची दुकाने उघडी आहेत आणि नवी मुंबई, पनवेल परिसरातील कोरोनाबाधित क्षेत्रातूनसुद्धा बरेचजण दारू खरेदी करण्यासाठी मोहोपाडा व चौक येथे मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे मोहपाडा व चौक येथेही प्रादुर्भाव होण्याची संभावना नाकारता येत नाही. या लोकांना संभाव्य धोक्यापासून वाचवावे, असे आमदार महेश बालदी यांनी म्हटले आहे. 
राज्य शासन, रायगड जिल्हाधिकारी तसेच उत्पादन शुल्क विभाग यांचे दारू विक्रीची दुकाने उघडण्याचे स्पष्ट आदेश असताना, दुकाने उघडण्याबाबत नागरिकांमध्ये उगाच संभ्रम निर्माण होऊन रस्त्यावर पुन्हा पुन्हा वर्दळ होत आहे. आपण कोणत्या आधारे ही बंदी ठरवलीत याची माहिती दिल्यास येत्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून, शासनाचा खुलासा घेता येईल, असेही आमदार महेश बालदी यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात विचारणा केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply