Breaking News

लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल

 पेण ः प्रतिनिधी

एकीकडे अवकाळी पाऊस व दुसरीकडे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शेतीमाल विकण्यात शेतकरीवर्गाला अडचणी येत होत्या. अत्यावश्यक सेवेमध्ये जरी कृषी क्षेत्राला सूट देण्यात आली असली तरी ऐन हंगामाच्या काळात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचा माल सडून गेला. जो काही माल चांगल्या स्थितीत आहे त्याची विक्री करून तुटपुंजी कमाई होत असल्याने स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यातही अडचणी येत आहेत. आता नवीन लागवडीसाठी बी, बियाणे, खते, औषधे खरेदी करणेही मुश्कील झाले असून यामुळे शासनाच्या मदतीची गरज भासू लागली आहे.

नागोठणे नियंत्रण कक्षात बाहेरील 228 जणांची नोंद

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात शहरातून काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले 11 मार्चपासून आतापर्यंत अधिकृतपणे परवानगी घेऊन 228 नागरिक पुन्हा शहरात परतले आहेत. त्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती स्थानिक देखरेख व नियंत्रण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी दिली. 11 मार्च ते 30 एप्रिलदरम्यान 188 नागरिक शहरात परतल्याची नियंत्रण कक्षात अधिकृतपणे नोंद झाल्याचे स्पष्ट होत आहे. 1 ते 9 मेदरम्यान येथे 40 नागरिक परतल्याची नोंद झाली आहे. या 228 जणांमध्ये बहुतांश नागरिक मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल, सुरत, अलिबाग, रोहे, इंदापूर येथून आल्याचे झालेल्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे. आलेल्या नागरिकांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून त्यांची तपासणी करण्यात येते. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारल्यावरच त्यांना घरी पाठविण्यात येत असल्याचे डॉ. धात्रक यांनी सांगितले. बाहेरून आलेले काही नागरिक येथे नोंद न करता घरीच राहत असल्याचे आढळून येत असले तरी आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच आशा सेविका संपूर्ण शहरात घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत.

परराज्यातील प्रवाशांसाठी एसटी बसेस सज्ज

मुरूड ः प्रतिनिधीे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये काहिशी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यानुसार नोकरी, शिक्षण व अन्य कारणांमुळे राज्याच्या विविध भागांत अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी-शर्थींवर परवानगी दिली आहे. त्यांची वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाने निर्देश जारी केले आहेत. प्रवास करू इच्छिणार्‍यांनी शासनाचे विहित केलेले प्रवासास अनुमती देण्यात आल्यासंदर्भात सक्षम प्राधिकार्‍यांचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून 21 व्यक्तींचा गट तयार करावा. गटप्रमुखाने त्यांच्या नावांची यादी तीन प्रतीत आवश्यक प्रमाणपत्रांसह मुरूड आगारात सादर करावी. या कागदपत्रांसोबत प्रवासभाडे रक्कम भरणा केल्यास त्वरित एसटी बस उपलब्ध करून देण्यात येईल. तरी याकामी मुरूड आगारात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी (02144-274710, 8087268601) संपर्क साधण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक सुनील वाघचौरे यांनी केले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply