रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये अडकलेले रोह्यातील हजारो परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी शासनाचे निर्देश मिळाल्यानंतर या मजुरांनी ऑनलाइन अर्ज शासनाकडे केल्यानंतर अखेर शनिवारी (दि. 9) या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी मुहूर्त मिळाला असून मध्य प्रदेशसाठी रोहा तालुक्यातून 139 परप्रांतीय मजूर रवाना झाले आहेत.
रोहा तालुक्यात व्यवसायानिमित्त व धाटाव, नागोठणे औद्योगिक क्षेत्रात नोकरीनिमित्त परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने आले आहेत, मात्र लॉकडाऊननंतर येथील व्यवसाय व कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे परप्रांतातून आलेल्या मजुरांचा रोजगार बुडाला. परिणामी या कामगारांना आपल्या गावाची ओढ लागली होती, परंतु प्रवासाची सर्व वाहने बंद झाल्याने काही कामगारांनी पायी मोर्चा आपल्या गावाकडे वळवला, परंतु ही मोठी मजल कशी मारायची हा प्रश्न असताना शासनाने या मजुरांना गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
मजुरांना गावी जाण्यासाठी रेल्वे खाते व राज्य परिवहन मंडळ पुढे आले. यासाठी त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना दिल्यानंतर रोह्यात तीन हजारांवर अर्ज दाखल झाले होते. सर्व अर्जांची छाननी करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार शनिवारी रोह्यामधून 139 मजुरांना मध्य प्रदेशला जाण्यासाठी मंजुरी देण्यात आली. या मजुरांसाठी रोह्यातून सात एसटी बसेस बुक करण्यात आल्या होत्या. त्यातून मजुरांना पनवेल येथे पाठविण्यात आले. रात्री आठच्या सुमारास पनवेल ते रेवासाठी (मध्य प्रदेश) श्रमिक रेल्वेने या परप्रांतीयांना रवाना करण्यात आले. या वेळी मजुरांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला. प्रत्येक मजुराला पाणी बॉटल, मास्क, साबण, बिस्किटे आदी वस्तूंचे किट देण्यात आले. या वेळी रोहा उपविभागीय अधिकारी यशवंतराव माने, तहसीलदार कविता जाधव तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.