पोलादपूर : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याची सीमा बंद न केल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आतापर्यंत असंख्य चाकरमानी रायगड जिल्ह्यासह कोकणात शिरकाव करू शकले आहेत. मात्र, पोलादपूर या रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या तालुक्याच्या ठिकाणी अनेक पादचारी चाकरमान्यांना कशेडी घाटातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून परत जाण्यास भाग पाडले जात आहे. पोलादपूर शहरातील प्राथमिक शाळेची इमारत सध्या या पादचार्यांच्या निवासाचे केंद्र होऊ पाहात असून विनाकारण शहरवासियांवर कोरोना संसर्गाच्या संभाव्य धोक्याची टांगती तलवार दिसून येत आहे. रायगड जिल्हयाचे प्रवेशद्वार असलेल्या नवीमुंबई आणि पनवेलदरम्यानच्या वाशी पुलाजवळ मुंबईतून कोकणाकडे पायी चालत अथवा वाहनाने येणार्या लोकांना पहिल्या व दुसर्या लॉकडाऊन काळात न अडविल्याने मोठया संख्येने मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई, पनवेल आणि गुजरात राज्यांतील चाकरमानी रायगड जिल्ह्यासह कोकणात शिरले आणि एरव्ही लाठीमार देणारेही शांतचित्ताने त्यांना पुढे जाण्यास मोकळीक देऊ लागले. मात्र, तरीही गेल्या दोन्ही लॉकडाऊनप्रमाणे सध्याच्या तिसर्या लॉकडाऊनमध्येही रत्नागिरी सीमेवरून पादचारी आणि वाहनांतील चाकरमान्यांना परत पोलादपूर येथील प्राथमिक शाळेमध्ये पाठविले जात आहे. या सर्वांच्या जेवणासह चहा-नाश्त्याची सोय प्रशासनाला करावी लागत असून याकामी कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या पादचार्यांमध्ये अनेकांच्या हातावरील क्वारंटाइनचे शिक्के पुसले गेले असून काही आवश्यक खरेदीसाठी ते शाळेतून बाजारपेठेमध्ये जाण्याचे प्रयत्नही करू पाहात असल्याने तेथे असलेल्या पोलीस शिपाई आणि शिक्षकांवर मोठी जोखीम निर्माण झाली आहे. तसेच पोलादपूर शहरातील गॅरेजचालक नूरमहमंद पालोचिया यांनी या पादचारी कुटूंबियांना प्रत्येक तीनदिवस पुरेल इतकी बिस्कीटे, फरसाण आणि लहान बालकांसाठी खाऊ तसेच पत्रकार शैलेश पालकर यांच्याकडून मास्क व सॅनिटायझर दिले.
ठोस भूमिका घेण्याची गरज
सातारा जिल्ह्यातील भाजीपाला, दूध आणि फळे यांची वाहतूक सुरू असताना रायगड जिल्ह्यातील वाहतुकदारांना सातारा जिल्ह्यात आंबेनळी घाटातून प्रवेशबंदी असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून प्रवेशासंबंधात प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जाण्याची गरज निर्माण झाली आहे.