सुधागड : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील निराधार महिला, रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू व्यक्ती, कामगार, बेघर व्यक्तींना शासनाकडून ओएमएसएस योजनेंतर्गत धान्य देण्यात आले. अशाच प्रकारे तालुक्यातील शिळोशी ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब कुटुंबांना आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार, शिलोशी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. या वेळी एका कुटुंबातील एका व्यक्तीला दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ याप्रमाणे शिलोशी ग्रामपंचायत हद्दीतील 32 कुटुंबांना 88 पॅकेट्सद्वारे एकूण 440 किलो धान्य आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. आणखीही काही व्यक्तींना ओएमएसएस योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. शासनाच्या आवाहनाला अनेक सामाजिक संस्था, कंपन्या प्रतिसाद देत असल्याचे पहावयास मिळत आहे.