मुरूड : प्रतिनिधी
मच्छीमार सहकारी संस्था आणि त्यांच्या सभासदांच्या 120 अश्वशक्ती क्षमतेवरील नौकांचा डिझेल कोटा व मूल्यवर्धित कराची प्रतिपुर्ती (परतावा) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मस्त्य विकासमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याबद्दल मुरूड येथील सागर कन्या मच्छिमार संस्थेने गुरुवारी (दि. 17) घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार आमदार रमेश पाटील यांचे आभार मानले. डिझेल परतावा व स्वस्त डिझेल उपलब्ध करून दिल्याने मोठ्या होड्यांना दिलासा मिळाला आहे. कोळी समाजासाठी कार्यरत असलेल्या आमदार रमेश पाटील यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे सागर कन्या मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर मकु यांनी या वेळी सांगितले. आमदार रमेश पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे मच्छिमार सोसायट्यांना पूर्वीप्रमाणेच डिझेल मिळू लागले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मच्छिमार सोसायट्यांना दिलासा मिळाला असून आम्ही शासनाचे आभार मानतो, असे रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष व सागर कन्या मच्छिमार संघाचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले. या वेळी सागर कन्या मच्छिमार संघाचे सचिव मनोहर दामशेठ, संचालक रोहिदास मकु, मोहन मकु उपस्थित होते.