Breaking News

धक्कादायक! उरणमधील करंजात आढळले 21 रुग्ण

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यातील करंजा येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणि क्वारंटाइन केलेल्या 77 पैकी 21 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नवे रुग्ण चार कुटुंबांतील सदस्य असून, त्यात वृद्ध महिला-पुरुषांसह लहान मुलांचा समावेश आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने उरण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

करंजा येथील 43 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे 8 मे रोजी समोर आले होते. नवी मुंबई येथील एका रुग्णालयात डायलिसिसच्या उपचारासाठी ये-जा करताना कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने करंजातील व्यक्तीला लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्यापूर्वी या रुग्णाच्या वयस्कर आई-वडिलांचे 10 दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले. त्या वेळी सांत्वनासाठी अनेकांनी या व्यक्तीची भेट घेतली होती. त्याच्या संपर्कात आलेल्यांची संख्या 77 इतकी आहे. या सर्वांना क्वारंटाइन करून आरोग्य विभागाकडून त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट आला असून, त्यानुसार करंजातील चार कुटुंबांतील एकूण 21 जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 10 महिला, सहा पुरुष आणि एक ते आठ महिन्यांच्या पाच लहान मुलांचा समावेश आहे. त्यांना पनवेल येथील कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी 66 जण क्वारंटाइन

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या आणखी 66 जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून, गावातील मार्ग बंद करण्यात आले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. नव्या रुग्णांमुळे उरण तालुक्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 29 झाला असून, त्यापैकी चार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply