तालुक्यात 39 नवे रुग्ण आढळले; शहरी, ग्रामीण दोन्हीकडे संसर्ग
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात 39 नवे कोरोना रुग्ण आढळले असून, यात महापालिका क्षेत्रातील 24 आणि ग्रामीण भागातील 15 रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची महापालिका क्षेत्रातील संख्या 180 आणि तालुक्यातील 243 झाली आहे, तर उरण करंजातील 27 रुग्ण धरून जिल्ह्याचा एकूण आकडा 316 झाला आहे.
पनवेल मनपा हद्दीत खांदा कॉलनीत आठ, कामोठ्यात सहा, रोडपालीत चार आणि खारघर व कळंबोलीत प्रत्येकी तीन रुग्ण आढळले. ग्रामीणमध्ये करंजाडे आणि उलवेमध्ये प्रत्येकी सहा रुग्ण असून, सुकापूर दोन व उसर्लीत एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.
कामोठे सेक्टर 35मध्ये संकल्प सोसायटीत दोन महिला आणि से. 11 आशियाना कॉम्प्लेक्समध्ये दोन कोरोनाबाधित आढळले असून, त्यांच्या घरातील कुटुंब प्रमुखाला याआधीच लागण झालेली आहे. से. 17 रिद्धी सिद्धी दर्शनमधील गोवंडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि से. 5 मारुती टॉवरमध्ये राहाणारे व नागपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचार्याला संसर्ग झाला आहे. खारघर से. 11मधील फ्रेंड सोसायटीतील पूर्वी कोरोना झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या घरातील दोन जणांना नव्याने लागण झाली आहे. से. 16 वास्तुविहारमधील बेस्ट कंडक्टरला कोरोना झाला आहे.
खांदा कॉलनी से. 7 मधील श्रीजी संघ सोसायटी आणि सागरदीप सोसायटीतील प्रत्येकी चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्या घरातील व्यक्तीला पूर्वी कोरोना झालेला होता. कळंबोली से. 3 ई, केएल-5मधील दोन कुटुंबांतील तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्या घरातील आणि शेजार्यांना यापूर्वी कोरोना झालेला आहे. रोडपाली से. 10 कुबेर पॅलेसमध्ये राहाणार्या व चेंबूर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक असलेल्याच्या कुटुंबातील चार जणांना कोरोना झाला आहे. महापालिका हद्दीत सोमवारपर्यंत 1505 जणांची टेस्ट केली गेली. त्यापैकी 38 जणांचे रिपोर्ट अद्याप आले नाहीत. पॉझिटिव्हपैकी 95 जणांवर उपचार सुरू असून, 78 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले, तर सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सोमवारी कोरोनाचे नऊ रुग्ण बरे झाले.
पनवेल ग्रामीणमध्ये करंजाडे येथील एकाच कुटुंबातील चौघांसह सहा जणांना, तर उलवेमधील एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांना कोरोना झाला आहे. सुकापूरमध्ये दोन, तर उसर्लीत एक नवीन रुग्ण आढळला. आतापर्यंत ग्रामीणमध्ये 63 रुग्ण झाले असून, आठ जण बरे झालेत.