नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई मधील पोलीसांची कोरोनाशी मुकाबला करताना प्रतिकारशक्ति वाढावी याकरीता सोमवारी डॉ. प्रतीक तांबे यांनी त्यांना होमिओपॅथिक औषधाचे वाटप केले.
आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांनी काढलेल्या पत्रकानुसार होमिओपॅथीमधील ईी.अश्रल(30) हे औषध कोरोना विरुध्द लढण्यासाठी माणसामधील प्रतिकारशक्ती वाढविण्यास व रोगप्रतिबंधात्मक औषध म्हणून घेण्याचे सुचविले आहे. त्यानुसार नवी मुंबई मधील जवळजवळ 4000 (चार हजार) पोलीस मित्रांना या होमिओपॅथिक औषधाचे वाटप, आदित्य हेल्थ अॅण्ड एज्युकेशन सोसायटी, नवी मुंबई या सामाजिक संस्थेकडून नवी मुंबई झोन -1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सहकार्याने सोमवारी पोलीस उपायुक्त मुख्यालय शिवराज पाटील यांच्याकडे, पोलीस आयुक्त कार्यालय, सीबीडी येथे देण्यात आले. जे पोलीस सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहेत त्यांची प्रतिकारशक्ति वाढावी यासाठी या औषधाचे वितरण करण्यात आले.
या वेळी हिम्पाम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. एस. टी. गोसावी, महाराष्ट्रचे सहखजिनदार डॉ. एम. आर. काटकर, नवी मु्ंबईचे सदस्य डॉ. संतोष जयस्वाल, डॉ. प्रशांत आहेर, प्रतिभा इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंगचे व्यवस्थापक किरण शेडगे, ब्रदर लोकेश जाटवे आदी उपस्थित होते.
देशामध्ये अनेक राज्यांनी या होमिओपॅथिक औषधाचे वाटप शासकीय आरोग्य कर्मचारी, पोलीस, नागरीक यांच्यामध्ये केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही होमिओपॅथी मधील या औषधाचा उपयोग सर्वसामान्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी करावा, तसेच नवी मुंबईमधील आरोग्य कर्मचारी, अधिकारी, सर्वसामान्य नागरीक यांनाही होमिओपॅथिक औषध देण्यात यावे, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
– डॉ. प्रतीक तांबे