Breaking News

आयर्लंडच्या खेळाडूचा विक्रम

डेहराडून : वृत्तसंस्था

अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या एकमेव कसोटी सामन्याच्या मालिकेत अफगाणिस्तानने 7 गडी राखून सामना जिंकला. चौथ्या डावात अफगाणिस्तानला देण्यात आलेले 147 धावांचे आव्हान त्यांनी 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रहमत शाह (76) आणि इहसनुल्लाह (नाबाद 65) यांच्या 139 धावांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला, पण या सामन्यात आयर्लंडच्या खेळाडूने 142 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये न झालेला विक्रम केला.

आयर्लंडच्या पहिल्या डावात केवळ 172 धावा झाल्या. या डावात 11व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या टीम मूर्ताघ याने अर्धशतकी (नाबाद 54) खेळी केली; तर दुसर्‍या डावात टीमने 27 धावा केल्या. आयर्लंडने दुसर्‍या डावात 288 धावा केल्या. या दोन खेळीच्या जोरावर टीम मूर्ताघ याने 142 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला विक्रम केला. दोन्ही डावांत तळाच्या क्रमांकाला फलंदाजीसाठी येऊन 25 धावांपेक्षा अधिक वैयक्तिक धावसंख्या करणारा तो पहिला कसोटीपटू ठरला आहे.

दरम्यान, आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. या डावात आयर्लंडकडून मूर्ताघने 54; तर डॉकरेलने 39 धावा केल्या. या संघाचे 7 फलंदाज दुहेरी धावसंख्यादेखील गाठू शकले नाहीत. अहमदझाई आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले. अफगाणिस्तानचा पहिला डाव 314 धावांत आटोपला. त्यांच्याकडून रहमत शाहने सर्वाधिक 98 धावा केल्या, पण 2 धावांसाठी त्याचे शतक हुकले. त्यानंतर आयर्लंडचा दुसरा डाव 288 धावात संपुष्टात आला. या डावात ब्लबर्नीने 82; तर केविन ओ ब्रायनने 56 धावा केल्या. त्यानंतर 147 धावांचे अंतिम लक्ष अफगाणिस्तानच्या संघाने सहज पार केले.

इंग्लंड, पाकिस्तानच्या पंक्तीत स्थान

अफगाणिस्तानचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला आणि यासह त्यांनी विक्रमाची नोंद करताना भारताला न जमलेली गोष्ट करून दाखवली. पहिल्याच कसोटीत विजय मिळवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे, परंतु अफगाणिस्तानने दुसर्‍या कसोटीत विजय मिळवून इतिहास घडवला. इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांनी आपल्या दुसर्‍या कसोटीत पहिल्या विजयाची चव चाखली होती. त्यांच्या पंक्तीत अफगाणिस्तानने स्थान पटकावले. भारताला पहिला कसोटी विजय 25 सामन्यांनंतर मिळाला होता.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply