Breaking News

पनवेलमध्ये एक कोरोनाबळी, 13 नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून, 13 नवे रुग्ण आढळले आहेत. यात महापालिका क्षेत्रातील नऊ आणि ग्रामीण भागातील चार रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाच्या मंगळवारी (दि. 13) समोर आलेल्या रुग्णांमध्ये नऊ महिन्यांची एक बालिका आहे.  कामोठे चार, खारघर तीन, नवीन पनवेल आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एक असे महापालिका हद्दीत, तर ग्रामीणमध्ये उलवे दोन, कोन आणि विचुंबेमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. नव्या रुग्णांमुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील रुग्णाची संख्या 189 झाली असून, तालुक्यात 256 रुग्ण झाले आहेत, तर जिल्ह्याचा एकूण आकडा 336वर पोहोचला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 35मध्ये अथर्व सोसायटीत रहाणार्‍या व मानखुर्द पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 11 साई कृपा  कॉम्प्लेक्समध्ये राहणार्‍या महिलेला तिच्या पतीपासून संसर्ग झाला आहे. सेक्टर 34 मानसरोवर कॉम्प्लेक्समधील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला असून, तिच्या घरातील दोन व्यक्ती यापूर्वी पॉझिटिव्ह आल्या आहेत. सेक्टर 9मधील क्षीरसागर सोसायटीतील महिलेला तिच्या पतीपासून संसर्ग झाला आहे. खारघर सेक्टर 34 सिमरन  सफायर्समधील नऊ महिन्यांच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, तिच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. सेक्टर 10मधील लविस्ता सोसायटीतील महिला बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेहमी जात होती. तिला त्या ठिकाणी संसर्ग झाला आहे. सेक्टर 4मधील निकुंज सोसायटीत राहणार्‍या व शताब्दी हॉस्पिटल-गोवंडी येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍याला 24 एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्यावर मुंबईलाच उपचार करण्यात येऊन ते 29 एप्रिल रोजी बरे होऊन घरी आले, पण पनवेल महापालिकेला शासनाकडून 11 मे रोजी त्याची माहिती मिळाली.  
नवीन पनवेल सेक्टर 13, ए-टाईपमधील रिक्षा चालक आपल्या नातेवाईकाला बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये नेहमी घेऊन जात होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पनवेलमधील सहयोग नगर जोशी आळी येथील महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या पतीला यापूर्वी कोरोना झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीतील 1525 जणांची मंगळवारपर्यंत कोरोनाची टेस्ट केली गेली आहे. त्यापैकी 32 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. पॉझिटीव्हपैकी 96 जणांवर उपचार सुरू असून, 86 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर मंगळवारी आठ रुग्ण बरे झाल्याने त्यान घरी पाठवण्यात आलेे.
पनवेल ग्रामीणमध्ये मंगळवारी उलवे दोन, कोन आणि विचुंबेमध्ये प्रत्येकी एक असे चार रुग्ण आढळले असून, विचुंबे येथील वृद्ध महिलेचा रात्री मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीणमध्ये कोरोनाचे 67 रुग्ण झाले आहेत. त्यापैकीआठ जण बरे झाले आहेत.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply