घराच्या ओढीने पायपीट; प्रशासनाकडे मोठ्या संख्येने नावनोंदणी
कर्जत ः बातमीदार
लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या मजूर कुटुंबांनी आता आपल्या गावी जाण्यासाठी पायी वाट धरली आहे. पायी चालताना प्रचंड ऊन आणि त्रास सहन करत घरी पोहचण्याचा या कुटुंबांचा प्रयत्न आहे. कर्जत तालुक्यातून नुकतीच 325 मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.दरम्यान, तालुक्यात आणखी काही मजूर असून त्यांनीदेखील गावी जाण्यासाठी नावनोंदणी केली आहे. त्यांनाही लवकरच त्यांच्या गावी सोडले जाणार आहे. जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन सुरू करण्यात आले, मात्र कोरोना आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला गेला. तेव्हा कर्जत, खालापूर तालुक्यातील परिसरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजूर तसेच महाराष्ट्र राज्य अंतर्गत निवासी मजूर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पायी चालत आपल्या गावाची वाट धरू लागले. असंख्य मजूर कुटुंबांनी अनेक किलोमीटरची पायपीट आपल्या घराच्या ओढीने सुरू केली. रस्त्यात ठिकठिकाणी अनेक अडचणींचा सामना करीत त्यांची वाटचाल सुरूच आहे. त्यात महिला आणि मुलांच्या पायांना प्रचंड उन्हाच्या तडाख्याने भेगा पडून पायाला आलेले फोडदेखील फुटू लागले. त्यातच जळगाव, औरंगाबाद करमाड येथे दुर्घटनादेखील घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या भागात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करून त्यांना इच्छितस्थळी रवाना करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यात खोपोली, खालापूर येथील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे सुमारे 191 जण कर्जत तालुक्यातून कर्जत, मुरबाड महामार्गे आपल्या गावी चालत निघाले. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात निघालेले लोक पाहिल्याने कर्जत तालुक्यातील कळंब येथील पोलीस कर्मचार्यांनी विचारपूस केली असता ते सर्व उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील राहणारे आहेत. काही महाराष्ट्रातील जळगाव, पाचोरा, धरणगाव, मुक्ताईनगर या भागातील असून आपल्या गावी चालत निघाल्याचे समजले. याविषयी माहिती कळताच कळंब पोलीस चौकीत कार्यरत पोलीस कर्मचार्यांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली. सर्वांची आरोग्य तपासणी कळंब आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. निलेश यादव तसेच डॉ. योगेश पाटील यांनी करून त्यांची राहण्याची व्यवस्था कळंब पोलीस स्टेशनच्या आवारात करण्यात आली. राज्य परिवहनच्या पाच बसेस 110 मजुरांना कळंब येथून घेऊन रावेत, गोंदियाकडे रवाना झाल्या. अशोक शिंदे, विठ्ठल शामे, संदीप गावडे, देवराज, सुखदेव सांगळे हे चालक म्हणून, तर सुरेश पाटील, रोहन कोवे, संदीप वारे, शिवाजी मिसाळ, उत्तम कांबळे हे वाहक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक बसमध्ये सीटवर एक व्यक्ती असे 22 जण अशी सुरक्षेची काळजी घेण्यात आली. पनवेल येथून सुटलेल्या मध्य प्रदेशात जाणार्या ट्रेनमधून कर्जत तालुक्यातील 136 श्रमिक मजुरांनी प्रवास सुरू केला आहे. 12 मे रोजी सर्व मजुरांना कर्जत येथून एसटीने पनवेलला नेण्यात आले. सायंकाळी सहा वाजता पनवेलहून मध्य प्रदेशकरिता गाडी रवाना झाली.