नवी मुंबई : बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 17 तारखेपर्यंत आंतरराज्य परिवहन सेवा सुरू केल्याने अनेक नागरिकांनी गावी जाणे पसंत केले आहे. त्यासाठी एसटी डेपोत अर्ज करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र यात नवी मुंबईकरांची एसटी डेपो नसल्याने मात्र वाताहत सुरू आहे. परराज्यात जाणार्या मजुरांना व राज्यातील इतर जिल्ह्यांत जाणार्या नागरिकांना बसेस पकडण्यासाठी थेट पनवेल अथवा ठाणे एसटी डेपो गाठावे लागत आहे. या समस्येची राज्य शासनाने दखल घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
नवी मुंबईत आजतागायत एसटी डेपो तयार होऊ शकलेला नाही. नवी मुंबईसारखे शहर परिवहनच्या डेपोपासून वंचित राहिले आहे. तुर्भे येथे परिवहनची जमीन असूनही डेपो उभारण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नवी मुंबईकर आजही ऐरोली, तुर्भे, वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर येथे नागरिक ठाणे बेलापूर व सायन पनवेल हायवेवरून परिवहन सेवेचे थांब्यांवर गाडी पकडतात. त्यामुळे त्यांना डेपोची उणीव भासत नाही. मात्र कोरोनामुळे कधी नव्हे ते नवी मुंबईत एसटी डेपो असावा याची गरज नवी मुंबईकरांना भासू लागली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतून राज्याच्या सीमारेषेवर मजुरांना सोडण्यात येत आहे. तिथून हे मजूर आपल्या गाऊ जाणार आहेत. यातून नवी मुंबईकर मात्र वंचित राहिले आहेत. पनवेल अथवा ठाण्याशिवाय त्यांना पर्याय उरलेला नसल्याने पायी चालनेच त्यांच्या नशिबी आले आहे. त्यामुळे निदान वाशीत तरी एसटीची सेवा देण्यात यावी, अशी मागणी वाढू लागली आहे.
याबाबत स्थानिक पोलिसांनी आम्हाला किंवा जिल्हाधिकार्यांना सूचित करणे गरजेचे आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अर्धे ठाण्यात व अर्धे रायगड जिल्हाधिकार्यांच्या अधिकारात येत असल्याने ही गफलत झाली असावी. मात्र याबाबत जिल्हाधिकर्यांशी होणार्या बैठकीत नवी मुंबईकरांची व्यथा मांडण्यात येईल. -एन. सी. नाईक, अधिकारी, ठाणे जिल्हा परिवहन विभाग