
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड 19 रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांनी या आजाराला घाबरू नये तर योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आयुष्य मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत शुक्रवारी (दि. 15) खारघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शानाखाली स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी अर्सेनिक अल्बम 30 ह्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचे वाटप केले. कोविड 19 या आजाराचा संसर्ग पनवेल महापालिका क्षेत्रात वाढत आहे. महापालिका क्षेत्रात कोविडची बाधा झालेले 200 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. कामोठे आणि खारघरमध्ये कोविड 19 रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. कारण याठिकाणाहून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्या मार्फत या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी केंद्रीय आयुष्य मंत्रालयामार्फत केलेल्या सूचनांचे पालन केल्यास हा आजार आटोक्यात आणू शकतो. खारघर आणि खारघर गावातील नागरिकांची कोविड 19 बरोबर सामना करणायासाठी रोग प्रतिकार शक्ति वाढावी यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सूचनेनुसार स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील आणि नगरसेवक रामजी बेरा यांनी शुक्रवारी खारघर येथील भाजपच्या संपर्क कार्यालयात आणि घरोघरी जाऊन अर्सनिक अल्बम 30 या होमियोपॅथीक औषधाचे नागरिकांना मोफत वाटप केले. डॉ. सतीश भोईर यांनी औषध उपलब्ध करून दिले. औषधाचे वाटप करण्यासाठी विशाल नाईक, प्रीतम करावकर, गोपीनाथ पाटील, रघुनाथ पाटील, अभिषेक शेडगे, प्रदीप पाटील आणि अशोक म्हात्रे यांनी सहकार्य केले.