Breaking News

रेम्बो सर्कस कर्मचार्‍यांना दिलासा; आ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून अन्नधान्याची मदत

नवी मुंबई ः प्रतिनिधी

ऐरोली सेक्टर-10मधील मोकळ्या भूखंडावर रेम्बो सर्कसकडून लहान मुलांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या करमणुकीकरिता खेळ सुरू होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे हे खेळ बंद पडले. परिणामी तेथे अडकून पडलेले 95 कर्मचारी व कलाकार हालअपेष्टा सहन करीत आहेत. त्यांना जेवणाची व्यवस्थाही नसून सिलिंडर आणायला पैसे नसल्याने या सर्व कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली. त्या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार  मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी मोफत अन्नधान्याची मदत करण्यात आली.

 या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अनिकेत म्हात्रे उपस्थित होते. सर्कसच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर हसू फुलवणार्‍यांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. त्यामुळे कलाकार मोठ्या संकटात सापडल्याने त्यांना सामानाचे भाडे, कलाकारांचे मानधन असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना दिलासा मिळाला असून अडकून राहिलेल्या सर्कसमधील कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठीही सहाय्य मिळणार आहे. या वेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, मागील दोन महिन्यांपासून रेम्बो सर्कसमधील कलाकार व कर्मचारी अडकून पडल्याचे समजले. प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन व प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते सुबोध भावे यांनीही या कलाकारांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अडकून पडलेल्या या कर्मचार्‍यांची परिस्थिती खूपच बिकट आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनिकेत म्हात्रे व पनवेल भाजप पदाधिकार्‍यांकडूनही धान्याची मदत होत असून आज सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आज आपल्याला माणुसकी दाखविण्याची वेळ आली असून माणसाने माणसाला जगविणे महत्त्वाचे असल्याने आम्ही त्याला प्राधान्य देत आहोत, असे सांगत माणुसकी जपा व घरात राहूनच आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा, असे आवाहनही या वेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply