Breaking News

उरण तालुका भाजपकडून राज्य सरकारचा तीव्र निषेध; तहसीलदारांना निवेदन सादर

उरण : वार्ताहर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात राज्य सरकार संपूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी उरण तालुका भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 19) राज्य शासनाच्या विरोधात उरण तहसीलदारांना तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांनी आपल्या नगरसेवकांसह उरणचे निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे यांना निवेदन दिले.

निवेदन देताना उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक मेराज शेख, उरण तालुका भाजप सरचिटणीस सुनील पाटील, सुभाष गोवारी आदी

उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सर्व देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा कोविड-19च्या विरोधामध्ये संघर्ष करीत आहे. परंतु देशामध्ये कोविड-19चे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्युदर यांच्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक 1 वर पोहचलेला राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वच या सर्व गोष्टीकडे होत असलेले दुर्लक्षामुळे आज महाराष्ट्रातल्या जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. राज्यामध्ये प्रशासन नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात नाही. अशी लोकांची भावना झाली आहे. किंबहुना राज्य करणारे जे सत्ताधारी आहेत यांचे अस्तित्व या ठिकाणी जाणवत नाही. प्रचंड मोठ्या संकटाच्या वेळेला राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वार्‍यावर सोडले आहे. अशा प्रकारची लोकांमध्ये स्वाभाविक भावना निर्माण झालेली आहे.

कोविड-19 विरोधात केंद्र सरकारने ज्या गाईड लाईन्स आखून दिल्या त्या संदर्भात ज्या उपाय योजना केल्या. त्या उपाय योजनांना पुढचे पाऊल उचलण्यामध्ये राज्य सरकार संपूर्णतः अपयशी ठरले आहे. मग पीपीई कीट असतील, हॉस्पिटलची निर्मिती असेल, राज्यातील सर्व क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून एक चांगले नेतृत्व देऊन कोविड-19 विरोधात लढण्याकरिता बळ देणे असेल, अशा सर्वच बाबतीत राज्य सरकारचे नेतृत्व अपयशी ठरले आहे.

दुदैवाने जग, देश कोविड-19 विरोधात संघर्ष करत असताना महाराष्ट्रात मात्र महा आघाडीचे सरकार राजकारण करण्यात सातत्याने मग्न राहिलेले आहे. प्रत्येक वेळेला केंद्र सरकरकडे बोट दाखवायची आणि स्वत:ला आमदारकीची निवडणूक कधी लढविता येईल आणि ती बिनविरोध कशी करता येईल या करताच तडफड चालली होती, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

– तातडीने पावले उचलावीत! भाजप पदाधिकारी, नगसेवकांनी निवेदन देताना राज्य सरकारचा आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक तीव्र निषेध करतो आणि कोविड-19 विषयात तातडीने पावले उचलून याला अटकाव करावा. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरिता आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी केली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply