कर्जत : बातमीदार – उल्हास नदीच्या तीरावर उकरूळ गावाच्या हद्दीत नेरळ पोलिसांच्या पथकाने गावठी दारुभट्टी उद्ध्वस्त केली. या ठिकाणाहुन साधारणत: 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत उकरूळ गावच्या मागे उल्हास नदीच्या तीरावर गावठी दारूभट्टी सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार धाड टाकली असता, दोन अज्ञात इसम गावठी दारुभट्टी लावून नदीच्या तीरावर बसले होते. पोलीस आल्याचे पाहून दोन्ही आरोपींनी नदीत उड्या मारून पळ काढला. या वेळी गूळ, नवसागर पाणीमिश्रीत रसायन यांचा साठा हस्तगत करून ते सर्व जागेवरच नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी दोन फरारी आरोपींवर नेरळ पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 188, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (एफ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.