

कर्जत ः बातमीदार
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळे गावाच्या परिसरात पेज नदीच्या तीरावर बेकायदेशीररीत्या गावठी दारू बनविली जात होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून ही दारूभट्टी उद्ध्वस्त केली.
नेरळ पोलिसांच्या हद्दीतील बेकरे येथील गावठी दारूभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे बेकरे गावातील काही लोक सावळे येथे दारूची भट्टी चालवत असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे यांनी पोलीस कर्मचारी सचिन नरुटे, भूषण चौधरी यांच्यासह पेज नदी येथे धाड टाकली. तो भाग निर्मनुष्य असून जाण्यासाठी रस्ताही नाही, पण केवळ पाण्याची सोय असल्याने बेकरे गावातील काही लोक तेथे गावठी दारूभट्टी चालवत होते.
पोलीस आल्याचे पाहून निवृत्ती कराळे, कैलास कराळे आणि सौदागर कराळे हे नदीमध्ये उड्या टाकून पळून गेले. पोलिसांनी तेथील गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त करताना तेथे साठवून ठेवलेले 300 लिटर नवसागरमिश्रित रसायन जमिनीवर ओतून नष्ट केले, तसेच दारू बनविण्यासाठी लागणारी भांडी, प्लास्टिक पिंप फोडून टाकली. सदर गावठी दारूभट्टीप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात निवृत्ती कराळे, कैलास कराळे आणि सौदागर कराळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शिपाई लोखंडे अधिक तपास करीत आहेत.