श्रीवर्धन ः प्रतिनिधी – येत्या 15 ते 20 दिवसांत मोसमी पावसास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे देशावर जरी कोरोना महामारीचे संकट असले तरीसुद्धा शेतकर्यांना आपली शेतीची कामे करावीच लागणार आहे. त्या अनुषंगाने शेतकर्यांनी पावसाळ्याआधी कराव्या लागणार्या शेतीच्या मशागतीच्या कामांकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.
श्रीवर्धन तालुक्यात पावसाळ्यात प्रामुख्याने भाताचे उत्पादन घेतले जाते, परंतु तालुक्यातील अनेक गावेच्या गावे नोकरीधंद्यानिमित्त मुंबई- पुण्यासारख्या शहरांत गेल्याने गावी शेती ओसाड टाकण्यात आलेल्यांची संख्या जवळजवळ 80 टक्के आहे. जे शेतकरी या ठिकाणी शेती करतात त्यांनी आता मशागतीच्या कामांना जोरदारपणे सुरुवात केली आहे. आता जे चाकरमानी मुंबईहून परत आलेत, त्यांना आपल्या नोकरीधंद्यासाठी केव्हा जावे लागेल त्याची शाश्वती नाही. त्यामुळे आता तेदेखील शेती करतील, अशी आशा निर्माण झाली आहे.
मुंबईहून परत आलेल्या चाकरमान्यांनी गावी शेती करण्याचे ठरवले तर शासनाकडूनही त्यांना बी-बियाणे पुरवणे आवश्यक आहे. कारण मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता बहुसंख्य चाकरमान्यांनी गावाला येऊन राहणेच पसंत केल्याचे दिसत आहे. एकूणच शेतकर्यांची मशागतीच्या कामांसाठी लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.