लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; सर्वपक्षीय समितीची बैठक
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे हेच आपल्या सर्वांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे नामकरणासंदर्भात आयोजित बैठकीत केले. या वेळी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले तसेच त्यानंतर आठ दिवसांनी समितीची पुन्हा बैठक होणार असून त्या वेळी पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. याच अनुषंगाने वाशी येथे लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी (दि. 20) झाली.
या बैठकीला समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, खासदार संजय पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबईत विमानतळावर पहिले विमान उतरताच येथील उद्घोषणा लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने व्हावी यासाठी समितीच्या वतीने लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भूमिपुत्रांच्या भावनांची दखल घेण्याची विनंती करण्यात येणार आहे तसेच या मागणीबाबत पंतप्रधान कार्यालयाशीदेखील पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह करण्यात येईल, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर आठ दिवसांनी समितीची पुन्हा बैठक होणार असून त्या वेळी पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper