माजी खासदार संजीव नाईक यांची मागणी
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत सर्व कंत्राटी व कायम कामगार कर्मचारी अधिकारी रात्रंदिवस आपल्या जीवाचा धोका पत्करून कोरोना महामारी विरोधात लढत आहेत. त्यांच्या अधक प्रयत्नामुळे नवी मुंबई महानगरपालिका भागातील जनतेस या महामारी परिस्थितीत देखील नागरी सुविधा सक्षम रित्या पुरविण्यात येत आहेत. अशा कर्मचारी व अधिकार्यांना एक कोटींचे विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी श्रमिक सेनेचे अध्यक्ष माजी खासदार संजीव नाईकांनी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत सर्व कामगार कर्मचारी अधिकारी आपला जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष नागरिकांना, रोग्यांना सुविधा उपलब्ध करून देत आहेत. हे कर्मचारी अधिकारी थेट रुग्णांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रोगाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महापालिका रुग्णालयात व विभाग कार्यालयात तसेच सर्व कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व कामगार कर्मचारी अधिकार्यांना अद्याप शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सुविधा, विमा योजनेचा लाभ प्रशासन विभागाने लागू न केल्यामुळे कर्मचार्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून अनेक अधिकारी कर्मचारी यांना जाणीवपूर्वक प्रमोशन, अनुकंपा तत्वावर नोकरी, नियतकालिक बदली, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती या व इतर लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
वाशी विभाग कार्यालयात तीन कर्मचार्यांना कोरोना रोगाची लागण झाली असून त्यापैकी एका ज्येष्ठ सफाई कामगाराचा मुत्यू झाला आहे. वाशी विभाग कार्यालया समोरच कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामुळे कार्यालयातील अधिकारी कर्मचार्यांना रोगाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या विभाग इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे.
सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील सर्व परिचारिका, कक्षसेवक, सुरक्षा रक्षक, तंत्रज्ञ, डॉक्टर कर्मचारी अधिकारी यांना शासन धोरणानूसार रजा, आरोग्य सुविधा विमा योजना यांचा त्वरित लाभ सुरू करावा. मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी तातडीने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी यांची भरती करण्यात यावी. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा वापर करता येईल, अशी व्यवस्था वॉर्ड स्तरावर करावी. हे प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी केली आहे.