पनवेल : प्रतिनिधी – नैसर्गिक आपत्ती आली की महसूल कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी नुकसानीच्या पंचनाम्यापासून मदत वाटण्यापर्यंतची काम करीत असतात. या वाटपात झालेल्या गोंधळाच्या कहाण्या आपण नंतर अनेक दिवस ऐकत असतो पण याला काही अपवाद ही असतात. पनवेलचे मंडळ अधिकारी संदीप रोडे, करंजाडेचे तेलंगे अण्णा, तलाठी राठोड ही त्याची उदाहरण म्हणता येतील. कोणी मदतीची याचना करताच हे लगेच धावून जात असल्याने त्या व्यक्तीला ते देवदूतच वाटतात.
हॅलो, हॅलो, मी शितल मनतोडे, सेक्टर 1 शिवकृपा, नविन पनवेल येथून बोलते. सेव्हन हिल अंधेरी येथुन ट्रिटमेंट घेऊन निगेटिव्ह आल्यावर घरी आली आहे. पतीचे काम बंद आहे. घरात दोन लहान मुले आहेत जेवणाची आबाळ होते, मला मदत मिळेल का? मी तुमचा नंबर हेल्प लाईनवरुन घेतला आहे. संदीप रोडे यांनी लगेच आपले सहकारी तलाठी राठोड यांना पाठवून त्यांना धान्याचे किट दिले. दोन दिवसांपूर्वी त्यांना एका मध्यमवर्गीय महिलेच्या कुटुंबाची माहिती देताच तिला ही तलाठी राठोड यांच्या मार्फत मदत पोहचवली. करंजाडे येथील एका वृद्ध महिलेच्या कुटुंबाची माहिती देऊन मदत करायची विनंती करताच त्यांनी तेथील मंडळ अधिकारी तेलंगे यांना फोन करून माहिती दिली. तेलंगे अण्णांनी ही लगेच धान्याचे किट त्या कुटुंबाला नेऊन दिले.
संदीप रोडे यांना काही दिवसांपूर्वी एका महिलेचा फोन आला. तिने आपण मध्यमवर्गीय कुटुंबातील असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागातील असून संचारबंदीमुळे घरातील धान्य संपले आहे. आमची उपासमार होत असल्याने काही मदत मिळेल का? अशी विचारणा केली. मंडळ अधिकारी रोडे यांनी त्यांना पत्ता विचारला त्यांनी डोंबिवली पश्चिममध्ये राहत असल्याचे सांगितले. डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यात येत असल्याने पनवेलमधून काहीच करणे शक्य नव्हते. पण त्यांनी आपल्या ओळखीचे अंबरनाथ येथील तलाठी कांबळे यांचेकडून कल्याण येथील मंडल अधिकारी गायकवाड यांचा फोन नंबर मिळवून त्यांना या कुटुंबाची माहिती दिली. त्यांना शक्य असेल ती मदत करण्याची विनंती केली. त्यांनी ही मदत पोचवली. या आपत्तीच्या काळात संदीप रोडे यांच्या वयाचा विचार करून शासनाने त्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यांना फोन करताच ताबडतोब संबंधितांना कार्यक्षेत्राचा गोंधळ न करता मदत मिळणार याची खात्री बाळगता येते.