पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्याला दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट बसत असताना शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव वेगाने होताना दिसतोय. नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील व शिहू ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या चोळेटेप गावातील 61 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शिहू विभागात खळबळ उडाली आहे.
ही महिला विक्रोळी मुंबई येथून 16 मे रोजी त्यांच्या कुटुंबियांसह आपल्या गावी आली होती. 19 मे रोजी थंडी ताप आलेने प्रथम डॉ. कोकणे, हॉस्पिटल, नागोठणे येथे आणले होते, तिला मुंबई येथून आलेने डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखाना पेण येथे नेण्याचे सूचित केले, त्याप्रमाणे रुग्णाला पेण सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून 20 मे रोजी कोरोनाचे काही लक्षणे दिसत नाहीत म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अशातच महिलेला शुगरचा त्रास असल्याने पेण येथील खाजगी डॉक्टर म्हात्रे यांच्या दवाखान्यात दाखल केले. तेथे रुग्ण महिलेच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी स्वॅब तपासणी करून अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. तसेच कोरोनाबाधित महिलेचा दिर यांना देखील ताप येत असलेने 23 मे रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दाखल करण्यात आले, त्यांना दम्याचा त्रास जाणवू लागल्याने आयसीयूमध्ये दाखल केले आहे, त्यांचे स्वॅब तपासणी अहवाल येणे बाकी आहे.
या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान नागोठणे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी चोळे टेप गावात खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना बाधित क्षेत्राच्या अनुषंगाने बंदोबस्त लावला आहे.