कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील रोहन अर्जुन कराळे हा तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2018मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विक्रीकर निरीक्षक विभागात पहिला आला आहे. एमपीएससी परीक्षा पास होणार्या तरुणांमध्ये सर्वसाधारण श्रेणीत रोहन कराळे याने यश संपादन केले आहे.
पोलिसांच्या यादीत गावठी दारू बनविणारे गाव म्हणून 1970-2005पर्यंत कर्जत तालुक्यातील बेकरे गाव आघाडीवर होते. गावातील तरुणाईदेखील या व्यवसायात उतरलेली दिसायची. हळूहळू गावातील अनेकांचे प्रबोधन सुरू झाले आणि 2005नंतर बेकरे गावात तरुण पिढीने शिक्षणाला आपलेसे केले. त्यामुळे ज्या गावात पूर्वी पोलिसांच्या धाडी पडून गावात वातावरण दूषित व्हायचे, त्याच गावातील तरुणांनी मग शिक्षणाच्या जोरावर पोलीस सेवेत; तर काहींनी रेल्वे सेवेत नोकरी पत्करली. मुंबई आयआयटीमध्ये या गावातील तरुण आज शिक्षण घेत आहे. एकाने मुंबई विद्यापीठमध्ये पीएचडी मिळविली. त्याच वेळी अनेक जण अभियंते आहेत.
अशाचप्रकारे कराळे गावातील रोहन कराळे या तरुणाने एमपीएससी परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. ओबीसी असतानादेखील 2018मध्ये विक्रीकर निरीक्षक पदासाठी सर्वसाधारण गटात अर्ज करणार्या रोहनने पूर्व
परीक्षेत यश मिळवून मुख्य परीक्षेत प्रवेश मिळवत पहिला क्रमांक पटकाविण्याची किमया केली. विक्रीकर विभागाच्या निरीक्षकपद परीक्षेत 161 गुण मिळवून सर्वसाधारण गटात त्याने प्रथम क्रमांक मिळविला. रोहनच्या यशाबद्दल बेकरेसह कर्जत तालुका आनंदला असून, याच्या शेकडो प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.