Breaking News

भूमिपुत्रांची फाऊंडेशनकडून दिशाभूल : आ. मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : प्रतिनिधी 

1971 पासूनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणाचा प्रलंबित प्रश्न अथक प्रयत्नांतून आपण मार्गी लावला आहे. नवी मुंबईतील सत्ताधार्‍यांनी केवळ मते मिळवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना गाजर दाखवत सिटी सर्वेक्षण प्रश्न झुलवत ठेवला होता, असा आरोप बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता पत्रकार परिषदेत बोलताना केला. फाऊंडेशनने मागील वेळी स्थानिक भूमिपुत्रांच्या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांकडून घेतलेले लाखो रुपये गेले कुठे? फाऊंडेशन कोणाची सुपारी घेऊन नवी मुंबईतील भूमिपुत्रांची दिशाभूल करीत आहेत, अशा सवालांच्या फैरीही आमदार म्हात्रे यांनी या वेळी उपस्थित केल्या. 

बेलापूर येथील के स्टार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर त्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, 1971 पासूनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणचा प्रलंबित प्रश्न अथक प्रयत्नांतून आपण मार्गी लावला. शासनाने नवी मुंबईतील मूळ गावठाण व विस्तारित गावठाणांच्या सिटी सर्वेक्षणास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. बेलापूर गावामधील विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण सुरूही झाले, परंतु एवढ्या मोठ्या कार्याचे श्रेय मिळू नये, याकरिता ग्रामस्थांना भूलथापा देऊन त्यांची दिशाभूल करून सिटी सर्वेक्षणाला विरोध करण्यास काही फाऊंडेशन संस्था सज्ज झाल्या आहेत. गावातील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित व्हावीत, यासाठी माझा हा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. आज ग्रामस्थांकडे आपल्या घरांचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, परंतु सिटी सर्वेक्षण झाल्यानंतर ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून, त्यांच्या घरांना क्रमांकीतही करण्यात येणार आहे. 

सिटी सर्वेक्षणाचा निर्णय हा ग्रामस्थांच्या हिताचा असून, फाऊंडेशन विनाकारण ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहे. जर हे सर्वेक्षण बंद झाले, तर ग्रामस्थांनी विस्तारित गावठाण क्षेत्रात बांधलेली गरजेपोटी घरे नियमित होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे ग्रामस्थांनी योग्य निर्णय घ्यावा असे सांगून ग्रामस्थांची कोणतीही घरे तोडू देणार नाही, हा माझा शब्द आहे, असे आमदार म्हात्रे म्हणाल्या. 

या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष नगरसेवक रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, नगरसेवक दीपक पवार हेही उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply