मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 48 मतदारसंघांतील सुमारे पावणेनऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे असून, त्याखालोखाल मावळचा क्रमांक लागतो; तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
राज्यात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यांत होणार्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचार्यांच्या सहाय्याने ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. राज्यात चार कोटी 57 लाखांहून अधिक पुरुष मतदार असून, चार कोटी 16 लाखांहून अधिक महिला मतदार आहेत.
राज्यातील ठाणे मतदारसंघात सर्वाधिक सुमारे 23 लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून, 12 लाख 60 हजारांहून अधिक पुरुष मतदारांची संख्या आहे; तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून, 14 लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख 35 हजार 597 एवढी महिला मतदारांची संख्या आहे.
मावळ मतदारसंघात सुमारे 22 लाखांहून अधिक, शिरूर व नागपूर 21 लाखांहून अधिक, आणि पुणे, बारामतीमध्ये प्रत्येकी 20 लाखांहून अधिक मतदार आहेत. रायगडातील मतदारांची संख्या ही सुमारे 16 लाख 37 हजार आहे.
नऊ मतदारसंघ राखीव
राज्यात नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून, अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.