पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात बुधवारी
(दि. 27) कोरोनाचे 23 नवीन रुग्ण आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात खारघर येथील घरकूल सोसायटीत राहणार्या 50 वर्षीय महिलेचा मृत्यू होऊन नवीन 18 रुग्ण आढळले आणि 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीणमध्ये दोघांचा मृत्यू झाला तसेच पाच नवीन रुग्ण आढळले. त्यात उलवेमध्ये राहणार्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरचा समावेश आहे, तर चौघांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात आता कोरोनाचे 547 रुग्ण झाले असून, 26 जणांचा मृत्यू झाला आहे
खारघरमधील मयत महिलेला पूर्वीपासून किडनीचा विकार होता. याशिवाय शांतिनिकेतन सोसायटीतील दोन व्यक्तींना कोरोना झाला आहे. कामोठेत एक पोलीस, नर्स, 10 वर्षांच्या मुलासह एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. नवीन पनवेलमध्ये आठ वर्षांच्या मुलाला आणि ए टाईपमध्ये दोघांना कोरोना झाला असून, त्यांना घरातील व्यक्तींपासूनच संसर्ग झाला आहे. कळंबोलीतील लॅब असिस्टंट म्हणून काम करणार्याला कोरोना आहे. याशिवाय पाले खुर्दतील कर्मचार्याचा, खांदा कॉलनीतील पोलिसाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीणमध्ये उसर्ली खुर्द येथील 50 वर्षीय आणि करंजाडे येथील 62 वर्षीय व्यक्तींचा मृत्यू झाला. उलवेतील डॉक्टर महिला व पोलीस, विचुंबे साई ऐश्वर्या येथील महिला, वडघर येथील मॅकेनिक आणि दापिवली येथील फायर ब्रिगेड अधिकार्याला कोरोना झाला आहे.