नवी मुंबई : विमाका
लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा मर्यादीत असताना कोकणातील आठ हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली. 1 एप्रिल ते 19 मे या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण दोन लाख 99 हजार 950 मे. टन मालाची निर्यात करण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाविरुध्द लढाई सुरु असताना शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या. यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचे संकट दूर करण्यासाठी कृषी माल निर्यात सुरळीत ठेवण्यात यश आले. या परिस्थितीत कृषी विभागाने जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामार्फत भारतातील फळे व भाजीपाला समुद्र व हवाई मार्गाने जगभरात निर्यात केला. मागील दीड महिन्यात विविध देशांच्या मागणीनुसार फळे व भाजीपाल्यांची निर्यात करण्यात आली आहे. आंबा आठ हजार 640 मे. टन, केळी 33 हजार 948 मे. टन, द्राक्षे नऊ हजार 509 मे. टन, डाळिंब एक हजार 773 मे. टन, कांदा दोन लाख 25 हजार 686 मे.टन, लिंबु 653 मे.टन, मिरची एक हजार 522 मे. टन, आले एक हजार 168 मे. टन, इतर फळे व भाजीपाला 17 हजार 051 मे. टन निर्यात करण्यात आले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत केळी, लिंबु, मिरची आणि आले याची निर्यात यावर्षी जास्त झालेली आहे. यामध्ये केळी गेल्यावर्षी 23 हजार 456 मे.टन तर यावर्षी 33 हजार 948 मे. टन निर्यात झाली आहे. म्हणजेच केळी निर्यात सुमारे दिडपट झालेली आहे. लिंबुची निर्यात गेल्यावर्षी 283 मे. टन होती. यावर्षी 653 मे.टन झाली आहे. मुंबईमधून गेल्यावर्षीच्या तुलनेत लिंबु निर्यात 230 टक्के झालेली आहे. हिरवी मिरचीची निर्यात गेल्या वर्षीच्या एक हजार 409 मे.टन तुलनेत यावर्षी एक हजार 522 मे. टन सुमारे 113 मे.टन जास्त झाली आहे. तसेच आल्याच्या निर्यातीतही चांगली वाढ झालेली असून गेल्यावर्षी आले निर्यात 846 मे. टन होती. यावर्षी एक हजार 168 मे. टन झालेली आहे.
उपाययोजना आणि नियोजन
कोरोनाच्या संकटातील लॉकडाऊनच्या काळात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथून कंटेनर आणि ट्रेलरसाठी वाहनचालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीच्या वेळी रस्त्यांवर कोणत्याही जेवणाच्या तसेच वाहन दुरुस्तीच्या सुविधा नसतांनाही निर्यातीसाठी फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देणे हे कौतुकास्पद आहे. पुढील काळात या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल. त्यासाठी योग्य उपाययोजना व नियोजन करण्यात आले आहे.