Breaking News

गुन्हे शाखेकडून सराईत चोरांना बेड्या; सोनसाखळी चोरीचे 30 गुन्हे उघड

पनवेल : वार्ताहर

मागील सहा महिन्यांपासून पनवेल परिसरात घडलेल्या 30 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 ला यश आले आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई बी. के. सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. बी. जे. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व अभिलेखावरील जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष देण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यात आला. या वेळी गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्यात वापरलेली वाहने, गुन्हा घडलेली वेळ व वार यांची माहिती संकलित करून तांत्रिक तपासावरून ठाणे पोलीस आयुक्तालय अभिलेखावरील सोनसाखळी चोरीमधील गुन्हेगार फजल आयुब कुरेशी (वय 25, रा. कल्याण) हा निष्पन्न झाला. आरोपी त्याचा मोबाइल हा दिवसांतून काही वेळासाठी फक्त चार ते पाच मिनिटासाठी चालू करीत असल्याने आरोपीस ताब्यात घेण्यासाठी मुंब्रा, भिवंडी, कल्याण, वर्तकनगर ठाणे येथे वेगवेगळी पथके पाठवुन या ठिकाणी सलग चार दिवस सापाळा लावुन या आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपीकडून सोनसाखळी चोरीच्या एकूण 12 गुन्ह्यांसह 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये पनवेल शहर, कळंबोली, खारघर, एपीएमसी, ठाणे, नारपोली, कोन गाव, मानपाडा, भिवंडी, डोंबिवली, वागळे इस्टेट, टोकावडे, कोळसेवाडी आदी भागातील उघडकीस आल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले दागिने व गुन्ह्यात वापरेलेल्या दोन स्कुटी मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

पनवेल : कामोठे वसाहतीमध्ये घरफोडी केल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कामोठे पोलीस ठाणे हद्दीमध्ये सेक्टर 13, कामोठे येथील आर्ट वॉच व फुड मॅजिक या दोन दुकानाचे शटर उचकटुन दुकानातील घड्याळे व रोख रक्कम चोरून नेल्याने कामोठे पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोरोनामुळे कारागृहामध्ये होणारा संसर्ग टाळण्यासाठी जामिनावर मुक्त केलेल्या आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्यांच्या समांतर तपासादरम्यान गुन्हा घडलेल्या ठिकाणी तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा करणारा आरोपी हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील तसेच कोरोना विषाणू संसर्ग टाळण्याच्या धर्तीवर न्यायालयाने मुक्त केलेला मिथुन मोजलीस सिकद्दर (वय 26, धंदा-भंगार विकणे, रा. मोठा खांदा गाव, पनवेल, मूळ रा. पं. बंगाल) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीस ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने वेगवेगळी पथके तयार करून कामोठे, खांदेश्वर, पनवेल, खारघर परिसरामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून सापळा लावून त्यास खांदेश्वर सर्कस मैदान येथे ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वी चोरी व घरफोडीचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply